रत्नागिरी हापूसचे भाव नियंत्रणात राहणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढू लागली असून, होळी पौर्णिमेनंतर बाजारातील आवक वाढेल. यावर्षी उत्पादन चांगले असल्याने आंब्याचे भाव नियंत्रणात राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

पुणे - रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढू लागली असून, होळी पौर्णिमेनंतर बाजारातील आवक वाढेल. यावर्षी उत्पादन चांगले असल्याने आंब्याचे भाव नियंत्रणात राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

यावर्षी आंब्यांचा हंगाम लवकरच सुरू झाला आहे. केरळातून यावर्षी आंब्याची चांगली आवक झाली. तेथील हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला असून, त्यापाठोपाठ आता कर्नाटकातील आंब्याची आवक सुरू झाली आहे. या दोन्ही राज्यांतून लालबाग, तोतापुरी, पायरी या आंब्याची आवक होत आहे. कर्नाटकातील हापूस आंब्याची आवक अद्याप मोठ्या प्रमाणावर झाली नाही. गेल्या आठवड्याभरात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. रविवारी साधारणपणे पाचशे पेटी इतकी आवक झाली. होळी पौर्णिमेनंतर कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम जोरात सुरू होईल, असा अंदाज आहे. 

गेल्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत कर्नाटक हापूस आंब्याने बाजारात बाजी मारली होती. भाव कमी असल्याने कर्नाटक हापूस आंब्याला मागणी होती. यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन चांगले आहे. सध्या बाजारात येणाऱ्या मालाची प्रत चांगली असून, कोणत्याही आंब्यावर डाग नाही, आकार चांगला आहे. 4 ते 7 डझनाच्या पेटीला अडीच ते साडेतीन हजार रुपये इतका भाव मिळत आहे आणि तयार आंब्याच्या पेटीला 3 हजार ते साडेचार हजार रुपये इतका भाव मिळत असल्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी 
गेल्यावर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याचे भाव कमी असल्याकडे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी नमूद केले. केरळ आणि कर्नाटक येथील आंब्याची आवक लवकर सुरू झाल्याने हा फरक पडला आहे, गेल्यावर्षी याच पेटीचा भाव साडेतीन हजार ते चार हजार रुपये इतका होता. यावर्षी एक हजार रुपयांनी भाव कमी झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम चांगला राहील आणि भावही नियंत्रणात राहतील.

Web Title: ratnagiri hapus mango