‘रावेत’ची उंची वाढणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पिंपरी - शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याची उंची वाढवावी किंवा बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. बंधाऱ्याची उंची वाढविल्यास निर्माण होणारे पाणलोट क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

पिंपरी - शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याची उंची वाढवावी किंवा बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. बंधाऱ्याची उंची वाढविल्यास निर्माण होणारे पाणलोट क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा ब्रिटीशकालीन असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शहराची तत्कालीन लोकसंख्या, भविष्यातील वाढ व पाण्याचा वापर विचारात घेऊन १९७२ पासून नगरपालिका (आता महापालिका १९८२ पासून) पाणीउपसा करीत आहे. रावेत येथे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारून हे पाणी भूमिगत वाहिन्यांद्वारे निगडी प्राधिकरणातील सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत बांधलेल्या जलकुंभांतून पाणीपुरवठा होतो. 

मात्र, गेल्या २० वर्षांत महापालिका क्षेत्राचा गतीने विकास होत आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.

रावेत बंधाऱ्यातून ४९० एलएलडी दशलक्ष व एमआयडीसीकडून ३० दशलक्ष लिटर पाणी घेत आहोत. बंधाऱ्याची उंची अर्धा किंवा एक मीटरने वाढविणे किंवा नवीन बंधारा बांधण्याचे विचाराधीन आहे. त्या दृष्टीने पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सद्यःस्थितीत बंधाऱ्याची उंची अर्धा मीटरने वाढविल्यास पुरेसे पाणी मिळू शकेल. 
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

पाटबंधारेकडून पाहणी
रावेत बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असून, त्यांच्यातर्फेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याची पाहणी केली आहे. त्यानुसार रावेत बंधारा जुना असल्याने त्याची साठवणूक क्षमता जलउपसा करण्याच्या अनुषंगाने कमी आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

महापालिका म्हणते...
रावेत बंधाऱ्यातून सध्या पूर्ण क्षमतेने पाणीउपसा होत आहे. त्यामुळे कधी कधी बंधाऱ्यातील पाणीपातळी खाली जाते. परिणामी, पाणीउपसा कमी प्रमाणात होऊन शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होतो. या संदर्भात महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांची बैठक झाली. त्यात रावेत बंधाऱ्याची उंची वाढविणे किंवा बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधावा यावर चर्चा झाली. 

थेट पद्धतीने काम
रावेत बंधाऱ्याची उंची वाढविल्यास पाणलोट क्षेत्राची धोक्‍याची पातळी तपासण्याचे काम तातडीने करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा न काढता सर्वांत कमी साडेपाच लाख रुपयांचे कोटेशन देणारे मे. राहुल देशमुख यांना महापालिका अधिनियमानुसार करारनामा करून थेट पद्धतीने काम द्यावे व त्यासाठीचा खर्च महापालिका अर्थसंकल्पातील ‘रावेत येथे नवीन बंधारा बांधणे’ या शीर्षाअंतर्गत तरतूद असलेल्या पाच कोटी रुपयांतून करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आहे. 

दृष्टिक्षेपात लोकसंख्या व पाणीपुरवठा
वर्षे       लोकसंख्या       पाणीपुरवठा

१९७१    ८३,५४२          २० एमएलडी (एमआयडीसीसह)
२०१८    २२ लाखांवर    ४९० एमएलडी (अधिक एमआयडीसी ११० एमएलडी)

Web Title: ravet Bridge Height Increase