दलदल, गाळ अन्‌ दुर्गंधी

Ravet-Dam
Ravet-Dam

पिंपरी - ढासळलेले काँक्रीट, प्रचंड दलदल, जलपर्णी, गाळ साचून निर्माण झालेली जमीन, त्यावर वाढलेले गवत, झाडेझुडपे आणि दुर्गंधी अशी स्थिती आहे, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याची. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध पाण्याचा उपसा केला जातो. या ठिकाणी महापालिकेसह एमआयडीसी आणि पुण्यातील वाघोली पाणीपुरवठा योजनेचेही अशुद्ध जलउपसा केंद्र आहेत. 

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढवावी किंवा बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधीने बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात या बाबी उघड झाल्या.

बंधाऱ्याचे वास्तव
ब्रिटिशकालीन बंधारा दगडी आहे. त्यावर काँक्रिटीकरण केलेले आहे. बहुतांश काँक्रीट व दगड निखळले आहेत. नागरिक रावेत किंवा पुनावळेला बंधाऱ्याच्या भिंतीवरून जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या पिशव्या ठेवल्या आहेत. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. वाघोली योजनेच्या जॅकवेल परिसरात गाळ साचून दलदल झाली आहे. त्यावर गवत व झुडुपे वाढलेली आहेत. यातून एक बेट निर्माण झालेले असून, नदीचे पात्र कमी झाले आहे. राडारोडा टाकल्याने पात्र आक्रसले आहे. 

बेट काढल्यास क्षमता वाढणार
रावेत बंधाऱ्याच्या काटावर टाकलेला राडारोडा, साचलेला गाळ व गाळामुळे निर्माण झालेले काटेरी बेट काढल्यास बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढू शकते. या संदर्भात तत्कालीन महापालिका आयुक्त दिलीप बंड, आशिष शर्मा व असीम गुप्ता यांनी रावेत बंधाऱ्याची पाहणी केली होती. मात्र, अजूनही यावर कार्यवाही झालेली नाही, असे माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी सांगितले. 

बंधाऱ्यातील जलपर्णी व झुडपे काढण्यासाठी पथक नियुक्त केलेले आहे. काही स्वयंसेवकही जलपर्णी काढतात. महापालिकेच्या जॅकवेल मार्गात गाळ नाही. अन्यत्र असलेला गाळ काढण्यासाठी यंत्रणा नाही. बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढविण्याबाबत जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

रावेत बंधाऱ्यातील गाळ व जलपर्णी वाहून जाण्यासाठी पूर्वी दोन ठिकाणी दरवाजे (जॅकवेल) होते. मात्र, आठ-दहा वर्षांपूर्वी बंधाऱ्याच्या भिंतीलगत महापालिकेने जलवाहिनी टाकली. ती वाहून जाऊ नये, यासाठी काँक्रीट टाकताना बंधाऱ्याचे दोन्ही दरवाजे बुजले गेले. तेव्हापासून गाळ साचून पाण्याला दुर्गंधी येत आहे. दोन्ही दरवाजे खुले केल्यास गाळ व जलपर्णी वाहून जाईल. तसेच, जेसीबी किंवा पोकलेन लावून गाळ काढल्यास बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढेल.  
- तुकाराम भोंडवे, माजी नगरसेवक, रावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com