मुलांमध्ये वात्‍सल्‍य रुजविणारी आईच जगात मोठी - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

रावेत - आपल्या मुलांमध्ये आईच्या हृदयाचे वात्सल्य रुजविणारी आईच जगात खऱ्या अर्थाने मोठी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. 

रावेत - आपल्या मुलांमध्ये आईच्या हृदयाचे वात्सल्य रुजविणारी आईच जगात खऱ्या अर्थाने मोठी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. 

चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने श्‍यामची आई पुरस्कार वितरण गौरव सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी गिरीश प्रभुणे, सुदाम भोरे, प्रशांत मोरे, नलिनी राऊत, किशोर राऊत, रंगनाथ गोडगे, पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने नलिनी राऊत व किशोर राऊत या माता आणि पुत्र यांना श्‍यामची आई सन्मानाने गौरविण्यात आले, तर प्रा. दिगंबर ढोकले यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार, तर बी. आर. माडगूळकर, दत्तात्रय शिंदे, मनीषा वेठेकर, कीर्ती मटंगे यांना साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले. 

या वेळी बोलताना कोत्तापल्ले म्हणाले, ‘आर्थिक श्रीमंत माणसे समाजाच्या फार काळ लक्षात राहत नाहीत; पण समाजासाठी काम करणारी माणसेच दीर्घकाळ स्मरणात राहतात. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी केलेला लढा हा समतेसाठी होता. माणसांनी माणसांना समपातळीवर वागणूक द्यावी हा विचार त्यात आहे. साने गुरुजी दिसायला मवाळ, तर विचाराने प्रखर क्रांतिकारी होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. आजच्या युगात स्त्रियांचा गुणगौरव होताना दिसत नाही. समाजाला खऱ्या अर्थाने उन्नत करण्यासाठी समाजातील स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवावी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’ 

या वेळी प्रभुणे म्हणाले, ‘उपेक्षित समाजाच्या व्यथा समजावून घेण्याची आज गरज आहे. शिक्षणाने नेमके काय बदलले याचाही विचार करावा लागेल. आईजवळ असलेले प्रेम, वात्सल्य काही प्रमाणात पुरुषांनी घेतले पाहिजे.’ या वेळी प्रशांत मोरे, भरत दौंडकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. नलिनी राऊत व किशोर राऊत यांच्याशी सदाफुले यांनी संवाद साधला. ढोकले, माडगूळकर, शिंदे, वेठेकर, मटंगे यांनी मनोगत व्यक्त केले. सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले, तर जयवंत भोसले यांनी आभार मानले.

जिद्दी पिढीसाठी आईने झटावे - प्रा. बानगुडे

सध्याच्या जीवनशैलीत मुलांना कोणत्याही परिस्थितीत लढण्याची जिद्द निर्माण करणारी आई पाहिजे. आईने जिद्दी पिढी निर्माण करावी. कोण अवतार घेईल व आम्हाला वाचवेल या भ्रमात न राहता जिजाऊंची लढवय्या वृत्ती महिलांनी स्वीकारण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे यांनी केले. ते शाहूनगर (चिंचवड) येथे मातोश्री प्रतिष्ठान आणि साई मित्रमंडळ आयोजित आई महोत्सवात ‘आई पाझर वात्सल्याचा’ या विषयावर बोलत होते. 

या वेळी माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, भगवान मुळे, भगवान पठारे, रामदास गाढवे आदी उपस्थित होते. बानगुडे म्हणाले, ‘‘जिच्या प्रेमाला, सोशिकतेला, संयमाला, वात्सल्याला व प्रसंगी कठोरतेला मर्यादा नाही असे दैवत म्हणजे आई. परमेश्‍वरापेक्षा आईचे महत्त्व मोठे आहे. आपल्या संस्कृतीने आईला मोठेपण दिलं असलं तरी समाजात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षांचा मात्र विचार व्हायला हवा. संस्काराची मोठी जबाबदारी आईने घेतली आहे. तिच्या कष्टाचा मात्र विचार होताना दिसत नाही. प्रत्येक कुटुंबात स्त्रियांचा सन्मान होण्याची गरज आहे.’’ 

ते पुढे म्हणाले, की जीवनसृष्टीतल्या सर्व वेदना नष्ट करण्याचे सामर्थ्य आईच्या स्पर्शात आहेत. पण अलीकडच्या माता आपल्या मुलांची प्रमाणापेक्षा अधिक काळजी घेतात. त्यातून त्या पुढच्या पिढाली दुबळ्या बनवत आहेत. उद्याची पिढी समाजातील विविध अपप्रवृत्तीला बळी पडणार आहे. त्या विरोधी लढण्याची तयारीही मातेलाच करावी लागेल. समाजातील स्त्रियांचे स्थान उंचावल्यास समाज जीवन उन्नत होईल. शिवचरित्र हे एका आईचा निर्धारच आहे हे समजून घ्यावे. पठारे, मुळे, गाढवे यांनी स्वागत केले तर राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: ravet pune news dr. nagnath kottapalle talking