'बालगंधर्व' पाडायला हरकत नाही, पण...

रवी परांजपे 
गुरुवार, 8 मार्च 2018

दृश्‍यकलांच्या बाबतीत परंपरा जपणाऱ्या, तिला पुढे नेण्यात रस बाळगणाऱ्या आणि परंपरा न मानणाऱ्या प्रयोगशील कलावंतासाठी अशी तीन स्वतंत्र कलादालने निर्माण करावीत. शिवाय पुणेकरांची सौंदर्यदृष्टीही त्यात असावी. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य या कलांसाठीही अशा प्रकारची दालने, रंगमंच व्यवस्था असावी. तळमजल्यावर हे महत्त्वाचे. 

बालगंधर्व रंगमंदिराची इमारत व त्याचा परिसर पुणे शहराचा 26 जून 1962 पासून सांस्कृतिक मानबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याच्या देखभालीचा सध्याचा पावणेदोन कोटींचा खर्च चर्चेत येतानाच बालगंधर्व पाडण्याची बातमी अनेकांना सतावत राहिली.

त्या बातमीने अनेक बालगंधर्वप्रेमी, पु.ल.प्रेमी, यशवंतराव चव्हाणप्रेमी मंडळींना मानसिक क्‍लेश झाला असल्यास आश्‍चर्य नव्हे. शिवाय मूलतः ते रंगमंदिर "परफॉर्मिंग' आर्टस्‌साठी राखीव अशा धारणेतून तयार झाले होते. आरंभी त्यात दृश्‍यकलांशी संबंधित असं काहीच नव्हतं. कालांतराने पहिल्या मजल्यावरील एका छोट्या नाट्यदालनाचे रूपांतर दृश्‍यकला दालनात केले गेले. हे सारे 1962 या वर्षीच्या सांस्कृतिक धोरणानुसार घडले. परंतु आज सदर रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू झाला असेल, तर त्याचे स्वागत करावेच लागेल. रचनात्मकतेचे अंदाज आज बदलले आहेत. तंत्रज्ञान विकासाला जवळच्या दृश्‍यकलांना खूप महत्त्वाचं स्थान मिळण्याची गरज वाढली आहे. याचा अर्थ असा नव्हे, की "परफॉर्मिंग'कडे दुर्लक्ष करावे, असं बिलकुल ठरता कामा नये. म्हणूनच "बालगंधर्व'च्या नूतनीकरणात "परफॉर्मिंग' आणि "नॉन परफॉर्मिंग' हा भेद नाहीसा करणारी दालनांची निर्मिती व्हावी. 

दृश्‍यकलांच्या बाबतीत परंपरा जपणाऱ्या, तिला पुढे नेण्यात रस बाळगणाऱ्या आणि परंपरा न मानणाऱ्या प्रयोगशील कलावंतासाठी अशी तीन स्वतंत्र कलादालने निर्माण करावीत. शिवाय पुणेकरांची सौंदर्यदृष्टीही त्यात असावी. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य या कलांसाठीही अशा प्रकारची दालने, रंगमंच व्यवस्था असावी. तळमजल्यावर हे महत्त्वाचे. 

बाहेरगावाहून येणाऱ्या कलावंतांना निवासी व्यवस्था भरपूर प्रमाणात असावी. सदर नवं बालगंधर्व कलासंकुल राजकीय पक्षांच्या कार्यक्रमासाठी कटाक्षाने नाकारले जावे. परंतु बालगंधर्व, पु.ल. देशपांडे आणि यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्व या संकुलात निश्‍चितपणे ठेवले जावे.

Web Title: Ravi Paranjape writes about Balgandharva Rang Mandir