#व्हॅक्‍सीनेशन : लसीची सात विद्यार्थ्यांना ‘रिॲक्‍शन’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची पुण्यातील सात विद्यार्थ्यांना ‘रिॲक्‍शन’ आल्याची माहिती पुढे आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे - गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीची पुण्यातील सात विद्यार्थ्यांना ‘रिॲक्‍शन’ आल्याची माहिती पुढे आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

 पोलिओपाठोपाठ गोवर आणि रुबेला या रोगांना देशातून हद्दपार करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम केंद्रीय आरोग्य खात्याने हाती घेतली आहे. एक महिन्यापासून ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना ही लस देण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांमध्ये गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्याची मोहीम २७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. पुण्यातही गेले आठ दिवस ही मोहीम सुरू आहे. वेगवेगळ्या शाळांबरोबरच अगरवाल शाळेतील मुलांनाही लस देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच लसीकरण केलेल्यांपैकी सात मुलांना मळमळणे आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने दत्तवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या बाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ. अमित शहा म्हणाले, ‘‘लसीकरण केलेल्या सर्व मुलांची प्रकृती चांगली आहे. त्यांना उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.’’ अकोला, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा काही ठिकाणीही काही मुलांना रिॲक्‍शन आल्याच्या घटना घडल्या आहेत. 

ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. लसीकरण करताना सर्व निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे सुरक्षित लसीकरण होत आहे. कोणतीही लस दिल्यानंतर ‘रिॲक्‍शन’ येतेच. त्यानुसारच या रिॲक्‍शन आल्या आहेत. अशा मुलांवर उपचार केले आहेत. त्यांना कोणताही धोका नाही.
- डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण विभाग

Web Title: Reaction for seven students of vaccination vaccine