Pune News : माणूस म्हणून घडण्यासाठी पुस्तके वाचा; उत्तम कांबळे

साहित्यिक उत्तम कांबळे ‘एसएनडीटी’तील विद्यार्थिनींना सल्ला
Read books to become good human being  Literary Uttam Kamble advice to students of SNDT pune
Read books to become good human being Literary Uttam Kamble advice to students of SNDT puneSakal

पुणे : ग्रंथ हे मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करत असतात. कारण गुलामीतून मुक्तीचा प्रवास हा पुस्तकांच्या पानातून होत असतो. त्यामुळे आयुष्यात माणूस म्हणून घडायचे असेल तर, ग्रंथांचे वाचन करा, असा सल्ला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी गुरुवारी (ता.१२) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील (एसएनडीटी) विद्यार्थिनींना दिला.

या विद्यापीठाच्या महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्राच्यावतीने ग्रंथोत्सव आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने कांबळे यांचे ‘मी का वाचतो? या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. शीतल मोरे, विद्यापीठाचे उपग्रंथपाल डॉ. विलास जाधव आदी उपस्थित होते. यानिमित्ताने कांबळे यांनी त्यांच्या जीवनातील प्रवास उदाहरणांसह उलगडून दाखवला.

कांबळे म्हणाले, माणसांनी शब्दाची निर्मिती केली. पण मानवाचा पहिला शब्द हा चित्ररूपी होता. हे शब्द जन्माला आले नसते तर, मानवी जीवन कुरूप झाले असते. प्रसिद्ध विचारवंत थॉमस पेन यांचे विचार वाचल्यामुळेच महात्मा जोतिराव फुले घडले.

शब्दांच्या नादाला लागणे ही आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे मानवी समृद्धीसाठी ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. वास्तव जीवनातील आणि समाजातील वास्तव साहित्यरूपाने समाजापुढे आणि व्यवस्थेपुढे आणू शकलो. यासाठी प्रसंगी मार खावा लागला. परंतु यामुळे त्यात सुधारणा घडू शकल्या, याचे समाधान आहे.’’

यावेळी विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संचालक डॉ. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शीतल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षा वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विलास जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com