रेडीरेकनरच्या दरवाढीस दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

शहरात तीन ते दहा, तर ग्रामीण भागात दहा ते पंधरा टक्के वाढ

शहरात तीन ते दहा, तर ग्रामीण भागात दहा ते पंधरा टक्के वाढ
पुणे - मंदी आणि नोटाबंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने या वर्षी पुणे शहरात रेडीरेकनरच्या दरात सर्वसाधारणपणे तीन ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात मोकळ्या जागांच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (शनिवार) पासून ही वाढ लागू होणार आहे. यात सदनिकाधारकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून एप्रिल महिन्यात रेडीरेकनरचे दर नव्याने जाहीर करण्यात येतात; परंतु गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. बांधकाम क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला. या पार्श्‍वभूमीवर मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात वाढ प्रस्तावित केली होती. त्यास शहरातील आमदार तसेच बांधकाम व्यावसायिकांनीदेखील विरोध दर्शविला होता.

गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत यासंदर्भात बैठक झाली होती. बैठकीत जनभावना लक्षात घेऊन पाटील यांनी वाढीस विरोध केला होता; मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाढीचा आग्रह धरला होता. त्यामुळे यंदाचा रेडीरेकनर दिलासा देणारा की धडकी भरवणारा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
रेडीरेकनर आणि बाजार दरातील मोठी तफावत दूर व्हावी, तसेच शेतकऱ्यांना जादा भरपाई मिळावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात मोकळ्या जागांच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले, तर सदनिकांच्या दरात मात्र फारशी वाढ न करता दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

थोडी खुशी-थोडा गम
दरवर्षी मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडीरेकनरच्या दरात सरसकट वाढ करण्यात येते. यंदा मात्र शहराच्या काही भागात शून्य टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही उपविभागातच तीन ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ सुचविण्यात आली आहे. पुणे शहरात 36 झोन असून, त्यामध्ये 500 हून अधिक उपविभाग आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय मुद्रांक शुल्क विभागाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यंदाचा रेडीरेकनर "थोडी खुशी थोडा गम' देणारा असणार आहे.

Web Title: ready reconer rate increase