नागरिकांच्या सतर्कता व सोशल मिडीयामुळे बेपत्ता मुलगी मिळाली 

manchar
manchar

मंचर - कुरळी (ता. खेड) येथून वैष्णवी देवा वाघमारे (वय १७) हि विशेष मुलगी शुक्रवारी (ता. २) सकाळ पासून बेपत्ता होती. कळंब (ता.आंबेगाव) येथे दुपारी अनोळखी मुलगी दप्तरासह फिरत होती. येथील तीन सतर्क नागरिकांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधला. सोशल मिडीयावर तिचा फोटो व्हायरल केल्यानंतर कुरळी गावाची मुलगी असल्याची ओळख पटली. तिला तिच्या आईकडे मंचर पोलिसांनी सुपूर्त केले.  

संगीता देवा वाघमारे यांची वैष्णवी हि मुलगी आहे. संगीता वाघमारे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. मुलगी बेपत्ता झाल्याने त्या अस्वस्थ होत्या. चाकण शहर व परिसरात त्यांनी मुलीचा शोध सुरु केला होता. कळंब वरून नारायणगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर सहानेमळा वस्तीजवळ सदर मुलगी पाठीवर दप्तर घेऊन फिरत होती. काहीवेळ ती नारायणगावच्या दिशेला तर काही वेळाने पुन्हा मंचरच्या दिशेला तिची ये- जा सुरु होती. सुदाम कुरकुटे, सचिन कुरकुटे, आयुब शेख यांना तिचा संशय आला. मुलगी स्वतःचे नाव सांगत होती. पण तिला पत्ता नीट सांगता येत नव्हता. तिच्या दप्तरातील वहीवर भैरवनाथ विद्यालय कुरळी –चाकण व विद्या देवा वाघमारे असे लिहिलेले होते. 

तिला भूक लागली होती. तिची नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. शेख यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर ताबडतोब पोलीस हवालदार राजेंद्र हिले व महिला पोलीस सोनाली नांगरे सहानेमळ्या जवळ आले. त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात नेले. सदर मुलीचा फोटो चाकण-कुरळी भागातील नागरिकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे व्हायरल केला. कुरळी येथील भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक आर. डी. थोरात यांनी ताबडतोब सदर माहिती मुलीची आई संगीता वाघमारे यांना सांगितली. शुक्रवारी संध्याकाळी मंचर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सदर मुलीला आईच्या ताब्यात दिले. “कळंबचे ग्रामस्थ व मंचर पोलीसांमुळे माझी मुलगी मिळाली आहे.’’ असे सांगताना आई संगीता वाघमारे यांचे अश्रू अनावर झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com