निधी नसल्याने अनुदान मिळेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

विद्यार्थी अपघात योजनेतील २६९ जण वंचित
पुणे - शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली अपघात सानुग्रह अनुदान योजनेला निधीचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे या वर्षी २६९ विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्‍कम मिळालेली नाही. 

दरम्यान, राज्य सरकारने योजनेसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातून विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.

राज्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सरकारने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना मदतरूपाने अनुदान दिले जाते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालनालयाने मागितलेला निधी गेल्या तीन वर्षांत कधीच पूर्णांशाने देण्यात आलेला नाही. त्यामुळे आलेल्या निधीतून शक्‍य तेवढ्या विद्यार्थ्यांना अनुदान द्यावे लागते.

शिक्षण संचालनालयाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मागणी केली होती. पण सरकारने आठ कोटी १९ लाख रुपये निधी दिला. या वर्षात अनुदानासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक हजार ३६२ होती. सरकारकडून आलेल्या निधीतून केवळ एक हजार ९३ विद्यार्थ्यांना अनुदान देता आले. उर्वरित २६९ विद्यार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांतही या योजनेसाठी तोकडे अनुदान देण्यात आले होते.
 
विद्यार्थ्यांना लवकरच अनुदान देऊ

विद्यार्थ्यांना अनुदान का देण्यात आले नाही, या प्रश्‍नावर शिक्षण संचालनालयातील उपसंचालक शरद गोसावी म्हणाले, ‘‘शासनाकडून आलेल्या निधीतून अनुदान दिले जाते. निधी कमी आल्याने काही विद्यार्थ्यांना ते मिळाले नाही; परंतु आता सरकारने अपघात अनुदान योजनेसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाईल. उर्वरित रक्कम पुढील शैक्षणिक वर्षासाठी वापरली जाईल.’’

Web Title: Receiving a grant if there is no funding