पुणे पोलिस दलाची पुनर्रचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

शहरात आता पाच परिमंडळे, 30 पोलिस ठाणी
पुणे - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलिस दलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुणे पोलिस प्रशासनामध्ये पूर्वी चार परिमंडळे होती, आता त्यामध्ये आणखी एक परिमंडळाची भर पडली आहे.

शहरात आता पाच परिमंडळे, 30 पोलिस ठाणी
पुणे - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलिस दलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुणे पोलिस प्रशासनामध्ये पूर्वी चार परिमंडळे होती, आता त्यामध्ये आणखी एक परिमंडळाची भर पडली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये होणाऱ्या पुनर्रचनेबाबत राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 16) बैठक झाली. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील मनुष्यबळ, कार्यालयबाबतही चर्चा झाली.

शहराच्या भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन व्यंकटेशम यांनी आणखी एका परिमंडळाची गरज व्यक्त केली. त्यानुसार पूर्वीचे चार परिमंडळे आणि नवीन एक अशी पाच परिमंडळे पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असतील. याबरोबरच पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या 39 पैकी नऊ पोलिस ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे गेली. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये 30 पोलिस ठाणी असतील. त्यामध्ये लोणीकंद, लोणी काळभोर, हवेली, बाणेर या प्रस्तावित पोलिस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पुनर्रचनेनंतर प्रत्येक परिमंडळामध्ये सहा पोलिस ठाणी असणार आहेत. नवीन परिमंडळ व नव्या पोलिस ठाण्यांमुळे काही प्रमाणात सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या रचनेमध्येही बदल करण्यात आला आहे.

विशेष शाखेच्या परकीय नागरिक विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्याकडे आता परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना परकीय नागरिक विभागाचे पोलिस उपायुक्त मदत करतील. गुन्हे शाखेचे युनिट पाचचे कार्यालय किंवा वाहतूक विभागाच्या मगरपट्टा येथील कार्यालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात परिमंडळ पाचच्या उपायुक्तांचे कार्यालय असेल. तसेच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त हे फरासखाना पोलिस ठाण्याच्या इमारतीतील कार्यालयामधून काम पाहतील.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी नव्हे, तर लोकांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशाने त्या-त्या भागात पोलिस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात "पीएमआरडीए'चे वाढणारे क्षेत्र आणि शहरालगत होणाऱ्या रिंगरोडमुळे गुन्हेगारी वाढू शकते. त्यादृष्टीने पुणे पोलिस आयुक्तालयाचा विस्तार करणे आवश्‍यक होते.
- शेषराव सूर्यवंशी, पोलिस उपायुक्त, प्रशासन

Web Title: Reconstruction of Pune Police Force