जनजीवन पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

दोन दिवसांपूर्वी सांगवी, कासारवाडी भागांत नदीलगतच्या नागरी वस्तीत असणाऱ्या रस्त्यांवर घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला असून, या परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. 

पिंपरी  : गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या पावसाने उघडीप घेतली असून, पवना नदीचे पाणी ओसरले आहे. दोन दिवसांपूर्वी सांगवी, कासारवाडी भागांत नदीलगतच्या नागरी वस्तीत असणाऱ्या रस्त्यांवर घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला असून, या परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. 

दोन दिवसांपासून पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे नदीलगतच्या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दापोडीतील हॅरिस पुलाजवळ असणाऱ्या भाऊ पाटील रोडवर पाणी आले होते. बुधवारी (ता. 6) पवना-संगम भागातील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. नदीतील पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे तो चिखलमय झाला होता. 

नदीतील भराव गेला वाहून 
जुनी सांगवी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून काही भाग बुजविण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपासून नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने हा भराव वाहून गेला आहे. पवनेच्या पात्रात टाकण्यात येत असणाऱ्या भरावाबाबतचे वृत्त पावसाळा सुरू होण्याअगोदर "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. 

सोसायट्यांमध्ये स्वच्छता सुरू 
पावसाने उघडीप घेतल्याने जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी परिसरातील घरे, सोसायट्यांत पाणी शिरले होते. त्यांनी परिसर स्वच्छतेचे काम महापालिका आणि नागरिकांनी हाती घेतल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. सोसायट्यांच्या तळघरात साचलेले पाणी मोटर लावून काढण्यात येत होते. 

पवना आणि मुळा नदीला आलेली पूरस्थिती कमी झाल्यानंतर सांगवी आणि दापोडी परिसरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही शाळांमध्ये पूरग्रस्त नागरिकांचे वास्तव्य असल्याने या शाळा सुरू होण्यास आणखी तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. महापालिकेच्या सांगवीतील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर शाळा, नरसिंह हायस्कूल, दापोडीतील पालिकेच्या भगतसिंग शाळा या ठिकाणी पूरग्रस्त बाधित कुटुंबांना निवारा देण्यात आला आहे. पूर ओसरला असला तरी घरांची स्वच्छता डागडुजी केल्यानंतरच या रहिवाशांना घरात जाता येणार आहे. त्यानंतर रिकाम्या झालेल्या शाळांची स्वच्छता करण्यासाठी एक दिवस लागणार आहे, ही कामे पूर्ण झाल्यानंतर या शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recover flood situation