पुण्यामध्ये ‘रिकव्हरी सेंटर’चा ट्रेंड

doctor
doctor

पुणे - शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा किंवा दीर्घ आजारांच्या उपचारातील काही काळ असा असतो, की त्यात रुग्णाला रुग्णालयात ठेवण्याची खरंतर गरज नसते; पण त्याच वेळी घरी कोणत्या ना कोणत्या कारणांनी रुग्णाची व्यवस्थित शुश्रूषा करता येत नाही. त्यातूनच ‘रिकव्हरी सेंटर’ हा ‘ट्रेंड’ पुण्यात सुरू झाला आहे.

आधुनिक काळात शस्त्रक्रियेतील तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणा झाल्या आहेत. त्यातून हृदयविकार, अस्थिरोग अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर पुढील काही तासांमध्येच डॉक्‍टर रुग्णाला घरी सोडतात. रुग्णालयातील जंतुसंसर्गामुळे रुग्णाचा तेथील मुक्काम कमीत कमी राहील, अशी डॉक्‍टरांची त्यामागची भूमिका असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रुग्णालयात ठेवता येत नाही किंवा कर्करोगाच्या दीर्घकाळ उपचार घ्यावा लागणाऱ्या विकाराच्या रुग्णाला फक्त उपचारापुरतेच रुग्णालयात दाखल करून घरी सोडले जाते. अशा वेळी रुग्णाला घरी नेऊन त्याची शुश्रूषा करण्यात अनेक मर्यादा येतात. आधुनिक काळातील नेमकी ही गरज लक्षात घेऊन, ‘रिकव्हरी सेंटर’चा नवा कल सुरू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

शहरांमध्ये काही चौरस फुटांमध्ये राहणाऱ्या घरात रुग्णाची शुश्रूषा करणे, काही प्रमाणात का होईना गैरसोयीचे ठरते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर प्रशिक्षित व्यक्तीकडून आपल्या जवळच्या रुग्णाची काळजी घेता यावी, अशी परदेशात असलेल्या ‘रिकव्हरी सेंटर’ची संकल्पना पुण्यात सुरू झाली आहे. 

याबाबत बावधन येथील पलाश एल्डरर्ली केअर अँण्ड रिकव्हरी सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ. शिल्पा वटे म्हणाल्या, ‘‘या केंद्रांमध्ये फिजिओथेरपीपासून ते नाकात नळ्या घातलेल्या रुग्णापर्यंतची काळजी घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्णाची घरातल्याप्रमाणे काळजी घेता येईल आणि त्याला आपलेपणाची भावना निर्माण होईल, याला या केंद्रात प्राधान्य देण्यात आले आहे.’’  

डॉ. मेधा सांगवीकर म्हणाल्या, ‘‘या केंद्राला रुग्णालयाचे स्वरूप येणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. कारण रुग्ण रुग्णालयातून बाहेर आला आहे. त्याला घरी असल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यासाठी त्याच्या औषधाच्या वेळा काटेकोरपणे पाळणे, ड्रेसिंग करणे, वैद्यकीय तपासण्या करणे हे आवश्‍यक असते. त्यातूनच रुग्णाची प्रकृती सुधारत असते.’

आधुनिक काळात घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर पडतात. अशा वेळी दिवसभर रुग्णाची काळजी घेणे, त्याचे पथ्यपाणी आणि औषधे वेळेवर देताना घरातील व्यक्तींना कसरत करावी लागते, त्यामुळे ही केंद्रं आधुनिक काळाची गरज आहे. या केंद्रातील प्रत्येक रुग्णाचा वेगळा आहार असतो, त्या प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. या सगळ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी येथे तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत.
- डॉ. शिल्पा वटे

का येतोय हा ‘ट्रेंड’?
शहरातील घरे छोटी विभक्त कुटुंब
रुग्णाची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षणाचा अभाव 
खासगी नर्सिंगमधून कर्मचारी रुग्णाच्या शुश्रूषेसाठी आल्यास घरातील लोकांची गैरसोय
बाहेरचा माणूस चोवीस तास घरात राहतो, हे नको असते
घरातून चोरीचे प्रकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com