रेड अलर्ट! घाटमाथ्यावर आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

सह्याद्रीच्या कुशीतील बहुतांश सर्व धरणे 90 ते 95 टक्के भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे.

पुणे : पुराच्या तडाख्यातून सुटकेचा निःश्‍वास टाकत असतानाच पुन्हा कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांमध्ये काही भागात जोरदार ते मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे सोमवारी (ता. 12) देण्यात आला आहे. 

सह्याद्रीच्या कुशीतील बहुतांश सर्व धरणे 90 ते 95 टक्के भरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अद्यापही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 13) आणि बुधवारी (ता. 14) पावसाचा जोर वाढण्याची 51 ते 75 टक्के शक्‍यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

कोल्हापूर आणि सांगली ही शहरे तसेच, या जिल्ह्यातील ग्रामीण भाग महापुरातून सावरत आहे. घाटमाथ्यांवर पडलेल्या पावसामुळे बहुतांश धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. वेधशाळेने सोमवारी या आठवड्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये या तीन जिल्ह्यांत घाटमाथ्यांवर पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पावसाचा अंदाज घेत धरणांतून विसर्ग सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे. 

कृष्णा खोऱ्याच्या या भागात बारा धरणे आहेत. त्यांची एकत्रित साठा क्षमता 209.88 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. त्यामध्ये आज सकाळी आठ वाजता एकूण 199.93 टीएमसी (95.27 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. कोयना धरणातून सुमारे 36 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 

प्रमुख धरणांतील पाणीसाठी (टक्‍क्‍यांत) 

राधानगरी 98
कोयना 97.5 
वारणा 92.8
दूधगंगा 94.8 
धोम 90.8 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red Alert by IMD Possibility of Heavy Rainfall today and tomorrow