पुनर्विकासासाठी महामंडळाकडून अर्थसाह्य

पुनर्विकासासाठी महामंडळाकडून अर्थसाह्य

पुणे - जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकास स्वत:च करावा, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून कमी व्याजदराने अर्थसाह्य करण्यात येईल. तसेच, गृहनिर्माण संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सहकार विभाग, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने रविवारी कोथरूड येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार कुलकर्णी, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त मधुकर चौधरी, जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, ॲड. जयंत कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे संस्थांच्या पुनर्विकासासाठी महामंडळ पुढाकार घेण्यास तयार आहे. गृहनिर्माण संस्थांनी या महामंडळाचे सभासद झाल्यास त्यांना कर्जपुरवठा करणे शक्‍य होईल. त्याचा व्याजदर चार टक्‍क्‍यांच्या जवळपास राहील. पण, संस्थांनी ठेवी महामंडळाकडे ठेवाव्यात. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना सहकारमंत्र्यांनी उत्तरे दिली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मोहम्मद अरिफ, संतोष हिंगाणे, नितीन देव, मिलिंद आकरे यांनी मार्गदर्शन केले.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. सदस्यांच्या मागण्या सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे.’’ चौधरी म्हणाले, ‘‘बहुतांश गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र, पुण्यात होत नाहीत. त्यासाठी रहिवाशांनी पुढाकार घ्यावा. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी संस्थांनी माहिती अद्ययावत करावी.’’ दरम्यान, ‘सकाळ’ प्रकाशनच्या मनीषा प्रभू यांनी लिहिलेल्या ‘गृहनिर्माण संस्थेचे सुलभ व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. 

‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासह विविध मुद्द्यांवर ‘सकाळ’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला. मुंबईत जिल्हा सहकारी बॅंक आणि म्हाडाच्या मदतीने गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास करण्यात येणार आहे. या धर्तीवर पुण्यात काय निर्णय घेणार, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच, आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुनर्विकासाच्या प्रश्‍नावर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com