पाणीकपातीचे संकट टळले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे (टीएमसीमध्ये) 
पानशेत : 6.70 
वरसगाव : 1.93 
खडकवासला : 1.63 
टेमघर : 00 
------------------------- 
एकूण साठा 10.26 

पुणे शहराची 15 जुलैपर्यंतची गरज 4.58 टीएमसी 
- दररोज होणारा पाणीपुरवठा 1350 एमएलडी 

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या शहराला दोन वेळ सुरू असलेला पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा केंद्र आणि कालव्याच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक असेल, तेव्हा महिन्यातून दोन ते तीन वेळा पूर्वसूचना देऊन पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने स्वतःच्या पातळीवर घ्यावा, असेही या बैठकीत ठरले. 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 10) समितीची बैठक झाली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आमदार शरद रणपिसे, ऍड. जयदेव गायकवाड, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, मेधा कुलकर्णी, दत्तात्रेय भरणे, सुरेश गोरे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अतुल कपोले, कार्यकारी अभियंता शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. त्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीत कपोले यांनी पाटबंधारे खात्याकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, ""पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चारही धरणांत मिळून 10.26 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात 6.25 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दररोज पुणे शहराला करण्यात येणारा 1350 एमएलडी पाणीपुरवठा विचारात घेतला, तर पंधरा जुलैपर्यंत पुणे शहराची पाण्याची गरज 4.58 टीएमसी असणार आहे. तर उन्हाळी हंगामात सिंचनासाठी 3.51 टीएमसी पाणी लागणार आहे. दौंड, इंदापूर नगरपालिका, 51 ग्रामपंचायती, औद्योगिक वापर आणि बाष्पीभवन लक्षात विचारात घेतले, तर यंदाची परिस्थिती समाधानकारक आहे.'' 

त्यावर पालकमंत्री बापट यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर बापट म्हणाले, ""पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आहे, त्यामुळे पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नाही. परंतु पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे. दुरुस्त्यांसाठी आवश्‍यक असेल, तेव्हा पूर्वसूचना देऊन महापालिकेने पाणीपुरवठा बंद ठेवावा.'' 

आमदार भरणे यांची कुरकूर 
इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मात्र शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची सूचना अप्रत्यक्षपणे केली. ते म्हणाले, ""हवामान खात्याने दिलेला अंदाज लक्षात घेऊन पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही. पंधरा जुलैनंतर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेला दररोज करण्यात येणाऱ्या 1350 एमएलडी पाणीपुरवठ्यात थोडी कपात करावी.'' तर दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेने विनाकारण शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये, अशी सूचना आमदार रणपिसे यांनी केली. 

Web Title: Reduction of water issue slove