#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली "टेनंट' ही सुविधा महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दुसरीकडे ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

पुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली "टेनंट' ही सुविधा महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दुसरीकडे ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

शहराच्या वेगवेगळ्या भागांत भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र काही वर्षांपासून शहरात होणाऱ्या घरफोड्या, फसवणुकीपासून ते समाजविघातक कृत्य करण्यासारख्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर भाडेकरूंची नोंदणी पोलिसांनी अनिवार्य केली आहे. मागील वर्षापासून पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणीसाठी "टेनंट' ही सुविधा देण्यात आली. मात्र महिन्यापासून ही सुविधा बंद आहे. याप्रकरणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्‌स या संघटनेने पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

"टेनंट' ही सुविधा 10 ऑगस्टपर्यंत सुरू करण्यासंदर्भातचा उल्लेख त्यावर केला होता. परंतु 20 ऑगस्टनंतरही ही सुविधा सुरू करण्यासाठी पोलिस प्रशासन लक्ष देत नसल्याची सद्यःस्थिती आहे. ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून उलट उत्तरे मिळत आहेत. संघटनेचे अध्यक्ष सचिन सिंघवी म्हणाले, ""ऑनलाइन सुविधा बंद असल्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. पोलिस ठाण्यातून नागरिकांना हुसकावून लावले जाते. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून ही सुविधा तत्काळ सुरू करावी.'' 

ज्येष्ठांना सवलत द्यावी 
शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिक आपल्या सदनिका, घरे किंवा खोल्या भाड्याने देतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना इंटरनेट वापरणे, भाडेकरूंची ऑनलाइन नोंदणी करणे जमत नाही. त्यामुळे ज्येष्ठांची अडचण समजून घेत पोलिसांनीच ही नोंदणी करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

आपल्यालाही काही अडचणी असल्यास आम्हाला कळवा... फेसबुक, ट्‌विटर व इन्स्टाग्रामवर

Web Title: Registration of tenants issue in pune