भाऊबिजेमुळे वाढले 'त्यांचे' मनोबल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पुणे - "श्रीरंगा कमलाकांता, हरी पदराते सोड रे...' या गवळणीच्या सादरीकरणाने झालेले सूरमयी वातावरण, गवळणीचे बोल आणि टाळ्यांच्या ठेक्‍यावर सादर झालेली नृत्याची अनोखी भेट कलाकारांनी अपंग जवानांना दिली. देशासाठी लढताना आलेले अपंगत्व... कुटुंबीयांपासून आणि सण- उत्सवांपासून दूर असलेल्या जवानांसोबत सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी भारतमाता की जय, वंदे मातरम्‌च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात भाऊबिजेचा आनंद लुटला. 

निमित्त होते, बुधवार पेठेतील "साईनाथ मंडळ ट्रस्ट' आणि "सैनिक मित्र परिवारा'तर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील जवानांसाठी आयोजित भाऊबिजेचे. या वेळी अभिनेत्री मधू कांबीकर, गायिका मंजूषा पाटील यांनी जवानांचे औक्षण करून त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे कर्नल बी. एल. भार्गव, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, परिवाराचे अशोक मेंहदळे, आनंद सराफ, प्रदीप महाले, मीरा ठकार, माला रणधीर, दादा पासलकर उपस्थित होते. 

कांबीकर म्हणाल्या, ""देशासाठी लढणारे जवान हीच आपली खरी संपत्ती आहे. प्रत्येकाने जवानांसाठी काहीतरी करायला हवे. मी अनेकदा चित्रपटांमध्ये भाऊबीज साजरी केली; परंतु आज जवानांसोबत साजरी केलेली भाऊबीज आगळीवेगळी आणि अधिक आनंद देणारी होती.'' 

भार्गव म्हणाले, ""अपंगत्व आल्यानंतर जवानांचे पुढील आयुष्य अवघड असते, त्यामुळे जवानांसमवेत सण- उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक जवानामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ जवानच देशसेवा करतात असे नाही, तर देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने आपापल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.'' 

अपंग जवान भोपालसिंग चौधरी म्हणाले, ""आज भाऊबीज साजरी करताना आमच्या कुटुंबीयांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अपंगत्व आले असले, तरी आमचे मनोबल खचले नाही.''

Web Title: Rehabilitation center for disabled soldiers in Kirkee