बारामतीत उलगडले भाऊबंध! - राजेंद्र पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

बारामती - गेली २५ वर्षे शिक्षण, शेती, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजेंद्र पवार यांचे आजवर न उलगडलेले पैलू, लहानपणापासून कळत्या वयापर्यंत एकत्र केलेली कष्टाची कामे व काही किस्से सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजवरचे भाऊबंध सोप्या शब्दांत उलगडले. त्यास उपस्थित बारामतीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. 

बारामती - गेली २५ वर्षे शिक्षण, शेती, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजेंद्र पवार यांचे आजवर न उलगडलेले पैलू, लहानपणापासून कळत्या वयापर्यंत एकत्र केलेली कष्टाची कामे व काही किस्से सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजवरचे भाऊबंध सोप्या शब्दांत उलगडले. त्यास उपस्थित बारामतीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. 

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीचा सोहळा येथील गदिमा सभागृहात शनिवारी झाला. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते अमरावतीतील प्रयास व सेवांकुर संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे डॉ. अविनाश सावजी, अंध, दिव्यांग व विशेष उमेदवारांना प्रशासकीय अधिकारी बनविण्यासाठी झटणारे जळगावचे शिक्षणतज्ज्ञ यजुवेंद्र महाजन, शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक संवेदना जागविणारे प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख, कचऱ्यातून खते व इतर उपपदार्थ बनविणाऱ्या निर्मला कांदळगावकर, वंचितांसाठी शाळा चालविणाऱ्या रेणू दांडेकर, थॅलसेमिया पीडितांना मदत करणाऱ्या सुजाता रायकर व पुस्तक पेढीच्या माध्यमातून राज्यातील शेकडो शाळांपर्यंत पोचलेले प्रदीप लोखंडे यांचा गौरव करण्यात आला. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रोतील कामगार, शिपाई, विद्यार्थी, युवक, प्राध्यापकांसह ६१ जणांनी ६१ दीप लावून पवार यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी गायक सलिल कुलकर्णी, संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम झाला. राजेंद्रसिंह, चंद्रकांत देशमुख यांचे पवार यांच्या कार्याला उजाळा देणारे भाषण झाले. 

आजवरचा प्रवास मांडताना आई-वडील, पत्नी सुनंदा पवार यांच्याविषयी सांगताना राजेंद्र पवार भावुक झाले. या पुढील काळ हा संपूर्ण समाजसेवेसाठी देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.    

या वेळी संपूर्ण पवार कुटुंबीय, खासदार अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आमदार राहुल कुल, मिलिंद गुणाजी, निवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी, विकास देशमुख यांच्यासह राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: relation rajendra pawar