आधी निधी द्या; मग भूमिपूजन करा 

आधी निधी द्या; मग भूमिपूजन करा 

माळेगाव : बारामतीत पालकमंत्र्यांचे स्वागत करू...परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय कोणीतरी सांगतो म्हणून घेऊ नये. सरकार तुमचे आहे. माळेगावच्या विकासासाठी निधी द्या आणि खुशाल त्या कामाचे भूमिपूजन करा. आम्ही तुमचे मोठ्या मनाने स्वागतच करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले. 

माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार तळ, गोफणेवस्ती रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. 28) देवकाते यांच्या हस्ते झाले. या कामांसह या अगोदर सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन सोमवारी (ता. 30) पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपचे सरपंच जयदीप तावरे, रंजन तावरे यांनी केले आहे.

तो धागा पकडत देवकाते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ""माळेगावातील विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी रोहिणी रविराज तावरे, संजय भोसलेंसह राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा केला. म्हणूनच माळेगावात प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरवली-कऱ्हावागज रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. असे असताना रंजन तावरे गावासाठी तीन महिन्यांत सात कोटी रुपये आणले असे म्हणतात. अर्थात ही बनवा बनवी पालकमंत्री जाणून आहेत.'' 

रविराज तावरे यांनी विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत माहिती दिली. या वेळी बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, दीपक तावरे, रमेश गोफणे, धनवान वदक, राहुल झारगड, वसंत तावरे, प्रवीण बनसोडे, बंडू पडर, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. 

माळेगावकरांची दिशाभूल... 
आम्ही जे केले, तेच बोलतो. त्यामुळेच मतदार आम्हाला हजारोंच्या पटीत मतदान करून निवडून देतात. त्यामुळे तीन महिन्यात गावासाठी सात कोटी आणले म्हणणाऱ्यांनी माळेगावकरांची दिशाभूल करू नये, अशी टीका रविराज तावरे यांनी रंजन तावरे यांच्यावर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com