"बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटाचा रीमेक लोहगावमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021


19 महिन्यांपूर्वी एका वीज ग्राहकाने बिलाची संपूर्ण रक्कम भरून मीटर परत केले. महावितरणने देखील ते सर्व प्रक्रिया पूर्ण करून जमा करून घेतले. आता नवीन मीटर घेण्यासाठी गेल्यानंतर परत केलेल्या मीटरची 19 महिन्यांची वीजबिलाची थकबाकी भरा, त्याशिवाय मीटर मिळणार नाही, असा हट्ट ही महावितरण धरून बसले आहे. 
 

पुणे : महावितरणाचा कारभार कसा चालतो, यावर "बत्ती गुल मीटर चालू' नावाचा एक चित्रपट नुकताच येऊन गेला. तुम्ही म्हणाल चित्रपट आणि वास्तव वेगळे असते. परंतु वास्तवात देखील असे घडू शकते, हे महावितरणनेच दाखवून दिले आहे. ते देखील लोहगाव येथील वीज ग्राहकाच्या उदाहरणावरून समोर आले आहे.

19 महिन्यांपूर्वी एका वीज ग्राहकाने बिलाची संपूर्ण रक्कम भरून मीटर परत केले. महावितरणने देखील ते सर्व प्रक्रिया पूर्ण करून जमा करून घेतले. आता नवीन मीटर घेण्यासाठी गेल्यानंतर परत केलेल्या मीटरची 19 महिन्यांची वीजबिलाची थकबाकी भरा, त्याशिवाय मीटर मिळणार नाही, असा हट्ट ही महावितरण धरून बसले आहे. 

लोहगाव येथील बी.जी. थोरात यांच्या बाबतीत हा किस्सा घडला आहे. थोरात यांनी एका व्यक्तीकडून जागा विकत घेतली. त्या व्यवहारावरून वाद झाल्याने थोरात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने थोरात यांच्या बाजूने निकाल दिला. थोरात यांना जागेचा ताबा मिळाला. दरम्यान थकबाकीमुळे त्या जागेवरील मीटर महावितरणने काढून नेले होते. थोरात यांनी ती सर्व थकबाकी भरली. तसेच तो मीटर महावितरणकडे जमा देखील केला. मीटर जमा केल्याची आणि थकबाकी भरल्याची पावती देखील थोरात यांच्याकडे आहे. त्यांना नवीन वीजजोड हवा आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून ते महावितरणच्या कार्यालयात जात आहे. "थकबाकी भरल्याशिवाय तुम्हाला नवीन वीजजोड मिळणार नाही,' असे महावितरणाच्या कार्यालयातील क्‍लार्कपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वजण एकच उत्तर देत आहेत. 

मीटर जमा केला आहे. परत केलेल्या मीटरची थकबाकी देखील भरली आहे. मीटर जागेवर नाही, वीज वापर केलेला नाही. तरी ही 19 महिन्यांची थकबाकी मी का भरावी, असा थोरात यांचा प्रश्‍न आहे. त्या प्रश्‍नाला मात्र कोणीहीच उत्तर द्यावयास तयार नाही. त्यामुळे काय करावे आणि कुठे दाद मागावी,असा प्रश्‍न थोरात यांना पडला आहे. 
मीटर जमा केल्यानंतर त्यांची नोंद बिलींग विभागात होणे अपेक्षित असते. मात्र ती महावितरणकडून करण्यात आली नाही. महावितरणच्या या चुकीचा फटका मात्र थोरात यांना सहन करावा लागत आहे. 

''परत केलेल्या मीटरचे जे बिल त्यांना देण्यात आले आहे. ते रद्‌ करण्यासाठीचा प्रस्ताव बिलींग सिस्टिमला पाठविले आहे. मीटर परत केल्याची नोंद सिस्टिम मध्ये करण्यास उशीर झाला आहे. येत्या चार दिवसात त्यांच्याकडून रिपोर्ट आल्यानंतर ते रद्द होईल. तो येत नाही, तो पर्यंत नवीन मीटर देता येणार नाही. ते लवकर देण्याचा प्रयत्न करू''
- दीपक गोंधळेकर ( सहायक अभियंता महावितरण, धानोरी) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remake of Batti Gul Meter Chalu in Lohgaon Pune by MSEDCL