कदमवाकवस्ती हद्दीतील ओढ्यावरील अतिक्रमणे हटवा : खासदार कोल्हे

कदमवाकवस्ती हद्दीतील ओढ्यावरील अतिक्रमणे हटवा : खासदार कोल्हे

लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीमधील सर्वच गावात ओढे, नाल्यावर मोठ्या प्रमानात अतिक्रमन झाल्याने, पावसाचे पाणी शेतीत व रहि्वाशी क्षेत्रात शिरल्याने नागरी वस्तीसह शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पुर्व हवेलीमधील सर्वच गावांना अतिवृष्टीपेक्षा ओढे, नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. महसुल विभागाने पुर्व हवेलीमधील ओढे, नाल्यावरील अतिक्रमानाची माहिती घेऊन, ही अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अशा सूचना खासदार अमोल कोल्हे यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) य़ेथे केल्या. 

खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार या दोघांनी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत मागील दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (ता. १६) दिवसभरात केली. कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नुकसानीची पाहणी करत असताना, नागरीकांनी ओढे, नाल्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी लोकवस्तीत व शेतीत शिरल्याचे कोल्हे व पवार यांच्या निर्दशनास आणून दिले. यावेळी कोल्हे यांनी कदमवाकवस्ती हद्दीतील ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. त्यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांना वरील सूचना दिल्या. 

यावेळी हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परीषद सदस्या अर्चना कामठे, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, ज्येष्ठ नेते गणपत चावट, कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच ऋुषी काळभोर, नितीन लोखंडे, प्रितम गायकवाड, पांडुरंग काळभोर, रमेश मेमाने आदी उपस्थित होते. 

ग्रामस्थांच्या वतीने बोलतांना जेष्ठ नेते गणपत चावट म्हणाले, कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीमधील ओढे, नाल्यावर मोठ्या प्रमानात अतिक्रमण झालेली आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्यावर एका नर्सरी चालकांना माती टाकुन अतिक्रमण केल्याने, पुणे-सोलापुर महामार्गातच्या रहिवाशी क्षेत्रात पाणी शिरल्याने, वाकवस्ती हद्दीतील व्यापारी व रहिवाशाचे एक कोटीहुन अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. ओढ्यावरीव अतिक्रमण हटविण्यासाठी मागिल दोन वर्षापासुन पाठपुरावा करुनही, प्रशासन दाद देत नसल्याने आजची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. याच विषयाबाबत माधव काळभोर, प्रताप गायकवाड, प्रितम गायकवाड आदी नागरीकांना आपआपली मते मांडली.

यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ''अतिवृष्टीपेक्षाही ओढे, नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळेच पुर्व हवेलीमधील नागरीवस्तीसह शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले ही बाब खरी आहे. महसुल विभागाने हवेली तालुक्यातील सर्वच गावातील ओढे, नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी करुन, सर्वच अतिक्रमणे हटवावित अशा सूचना प्रशासनाला देत आहे. याबाबत पुढील काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक लावून, हा मुद्दा सोडविला जाईल. अतिवृष्टीमुळे मागील दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यावर सध्या भर दिला जात आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com