'पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

सदर संघटनांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या : 
- शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे, त्याप्रमाणे सावित्रीबाई यांची मुद्रा असलेले नवे बोधचिन्ह विद्यापीठाने स्वीकारावे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात सावित्रीबाई यांचा पुतळा उभा करण्यात यावा.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून 'शनिवारवाडा' हटविण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांनी केली आहे. 'शनिवारवाडा हा शूद्रातिशूद्रांच्या, बहुजनांच्या आणि स्त्रीयांच्या गुलामगिरीचे प्रतिक असून शिक्षणाशी त्याचा काही संबंध नाही,' असा रोष सदर संघटनांनी व्यक्त केला आहे. 

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे यासाठी अनेक चळवळींनी प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर 2014 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. परंतू 1950 मध्ये माधव दिक्षित यांनी पुणे विद्यापीठाचे बनविलेले बोधचिन्ह 'कमळाच्या आकारात शनिवारवाडा' असेच आजतागायत राहीले आहे. ते बदलण्यात येऊन शनिवारवाड्याच्या ऐवजी बोधचिन्हात सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचा समावेश करावा, अशी मागणी शहरातील सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, सम्यगक विद्यार्थी आंदोलन, मुक्तवादी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती, कलासंगिनी, मुक्ती संघर्ष समिती, दलित आदिवासी अधिकार आंदोलन, नैर्ऋत्य समाजविज्ञान अकादमी, नैर्ऋत्य गणसंघ या संघटनांनी केली आहे. 

यासंदर्भात या संघटनांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शनिवारवाडा पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात का नको? व शनिवारवाडा संविधानविरोधी प्रतिक आहे या दोन मुद्द्यांना संघटनांच्या प्रतिनीधींनी मांडले. या संघटनांच्या म्हणण्यानुसार, 'ढोल गवार शुद्र पशू नारी, सब ताडन के अधिकारी' ही शनिवारवाड्याची धर्मनीती, राजनीती आहे. भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार अस्पृश्यता निर्माण करणारी भाषा, प्रतिके, चिन्हे यांना मज्जाव केलेला आहे. आमच्या गुलामगिरीचे प्रतिक आम्बी विद्येचे प्रतिक म्हणून स्वीकारु शकत नाही. पुणे विद्यापीठाला सत्यशोधक समतेच्या पाईक सावित्रीबाई फुले यांचे नाव असताना बोधचिन्ह विषमतेचे पाईक असणाऱ्या पेशव्यांच्या शनिवारवाड्याचे आहे.'

सदर संघटनांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या : 
- शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे, त्याप्रमाणे सावित्रीबाई यांची मुद्रा असलेले नवे बोधचिन्ह विद्यापीठाने स्वीकारावे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात सावित्रीबाई यांचा पुतळा उभा करण्यात यावा.

Web Title: remove Shantwarwada from university Logo