मुळा नदीच्या पुरात उतरून वीज प्रवाहाची दुरुस्ती (व्हिडिओ)

mula river
mula river

कोळवण (पुणे) : मुळा नदीच्या महापुरात बुडालेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे रिहे (ता. मुळशी) खोऱ्यातील गावांचा गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेला वीज पुरवठा मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालून महापुरात केलेल्या कामामुळे सुरू झाला. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मुळशी धरणातून मुळा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे घोटावडे पुलाजवळील ट्रान्सफॉर्मर बुडाला. त्यामधून वीज प्रवाह नदीत उतरेल, या भीतीने त्याच्या मुख्य वाहिनीवरील वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रिहे भागाचा वीज पुरवठा बंद होता. तो सुरू करण्यासाठी बुडालेल्या ट्रान्सफॉर्मरचा मुख्य वाहिनीपासून वीज पुरवठा बंद करणे गरजेचे होते. मात्र, पुराचे पाणी कमी होत नसल्याने ते अशक्‍य झाले होते. त्यात भरे- घोटावडे पुलावरून गेलेल्या पाण्यामुळे रिहे खोऱ्यातील नागरिकांचा पौड व पिरंगुटशी संपर्क तुटला होता. त्यातून येथील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिक "महावितरण'कडे करत होते. 

मात्र, नदीच्या महापुरात धोक्‍याच्या परिस्थितीत पाण्याखाली गेलेल्या ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा बंद करणार कोण? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला. त्यामुळे "महावितरण'चे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड यांनी रविवारी रात्री मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या "व्हॉट्‌सऍप ग्रुप'वर याबाबत माहिती देऊन मदतीची मागणी केली. तहसीलदार अभय चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीला मदत करण्यास सांगितले. 

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले. या ट्रान्सफॉर्मरचा प्रवाह बंद करण्यासाठी वायरमनची आवश्‍यकता होती. मात्र, पुराने पाणी आलेल्या नदीमध्ये जाऊन विजेखांबावर चढून या ट्रान्सफॉर्मरचा विद्युतप्रवाह कापणार कोण? असा प्रश्‍न उभा ठाकला. अशा वेळी "महावितरण'चे कर्मचारी राहुल मालपोटे व शुभम ढिले हे या कामासाठी तयार झाले. पथकातील प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, तुषार धनवे,विष्णू गोंडाबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता हे त्यांना घेऊन बोटीने ट्रान्सफॉर्मरजवळ गेले. तेथे मालपोटे यांनी भर पावसात खांबावर चढून या ट्रान्सफॉर्मर व विद्युत बॉक्‍सचा विद्युतप्रवाह बंद केला. त्यामुळे विद्युत प्रवाह पाण्यात उतरण्याचा धोका टळला. अखेर दोन दिवसांनंतर रिहे खोरे आणि परिसरातील सर्व गावे प्रकाशमान झाली. 

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव 
जिवाची बाजी लावणाऱ्या मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांचे व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे "महावितरण'चे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, बी. एस. वावरे, आदित्य प्रभुदेसाई व स्थानिक नागरिकांनी आभार मानून कौतुकाचा वर्षाव केला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com