रस्त्याच्या खड्ड्यांचा अजितदादांना दणका, अखेर यंत्रणा लागली कामाला

सावता नवले
Monday, 21 September 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती-पाटस रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगताच वेगाने सूत्र हलले. त्यामुळे रस्त्यावर मुरूम तर काही ठिकाणी डांबरखडीने खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू झाले आहे. 

कुरकुंभ (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच बारामती - पाटस रस्त्यावरून प्रवास करीत असताना गुंजखिळा ते रोटीघाट - पाटस येथून जाणार्‍या पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गा दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील खड्डयांचा अनुभव घेतला. हा अनुभव व रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना सुनावल्याने वेगाने सूत्र हलली अन् रस्त्यावर मुरूम तर काही ठिकाणी डांबरखडीने खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौड सार्वजनिक बांधकाम विभागाने गुंजखिळा ते पाटस दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली. पावसाने खड्ड्यातील मुरूमामुळे रस्ता चिखलमय होत असून दुचाकी घसरून अपघात होतात. तसेच खड्ड्यात वाहने आदळून नादुरुस्त होत आहेत. रस्त्याची चांगली दुरुस्ती करण्याऐवजी मुरूमाने तात्पुरती दुरुस्ती करून उपमुख्यमंत्र्यांचे समाधान केल्याचे जात असल्याची तक्रार रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

 

कुरकुंभ- गुंजखिळा रस्त्याचे काम सुरू असल्याने परिसरातील 50 पेक्षा जास्त खडीक्रेशरच्या खडीची अवजड वाहतूक पाटस - गुंजखिळा रस्त्याने होत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे. सध्या निधी उपलब्ध नाही, तरीही वरिष्ठांच्या सूचनेवरून खडीडांबराने खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. 
- एच. एन. माळशिकारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair of Patas road due to order of Deputy Chief Minister