होय! वीजकंपनीकडून झालेल्या ऊस जळीताची भरपाई मिळू शकते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होय! वीजकंपनीकडून झालेल्या ऊस जळीताची भरपाई मिळू शकते

होय! वीजकंपनीकडून झालेल्या ऊस जळीताची भरपाई मिळू शकते

sakal_logo
By
संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : वीजेच्या खांबावरील किंवा ट्रान्स्फॉर्मरमधील घोटाळ्यांमुळे ऊस जळीत झालाय पण भरपाई मिळत नाही अशीच तक्रार सातत्याने सर्वत्र ऐकू येत असते. परंतु थोडा पाठपुरावा करून योग्य कागदपत्रे सादर केली तर वीजकंपनीला भरपाई द्यावी लागते. वाणेवाडी (ता. बारामती) येथील सुभद्राबाई निंबाळकर यांनी पाठपुरावा करून वीजकंपनीकडून तब्बल ९३ हजार रूपये भरपाई वसूल केली आहे.

हेही वाचा: दहा वर्षाच्या चिमुरडीवर घरातल्या नोकरानेच केला बलात्कार; गंभीर जखमी

ऊस जळीताच्या घटना घडणे जवळपास नियमितच झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकरी काही हजारांपासून लाखापर्यंत नुकसान होते. वैयक्तिक चुकांमुळे आग लागली असेल तर भरपाईचा मुद्दाच संपतो. परंतु शेतातून गेलेल्या वीजेच्या तारा लोंबकाळणे, खांबावरील कप फुटणे, ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या उडणे अशा कारणांनी जर ऊस जळाला असेल तर मात्र भऱपाई वीजकंपनीकडून मिळू शकते. अनेक शेतकऱ्यांना वीजकंपनी भरपाई देते हे माहित नाही तर बहुसंख्य शेतकऱ्यांना कागदपत्रे काय द्यायची हे समजत नाही. वीजकंपनीकडून याबाबत फारशी जागृती करण्याची तसदी घेतली जात नाही.

बारामती विभागांतर्गत असलेल्या सोमेश्वर उपविभागात मात्र सुभद्राबाई महादेव निंबाळकर या शेतकरी महिलेने २०१७ मध्ये झालेल्या उस जळीतानंतर पाठपुरावा करून नुकतीच वीजकंपनीकडून समाधानकारक नुकसान भऱपाई पदरात पाडून घेतली आहे. उपविभागात तीन वर्षात अठरा शेतकऱ्यांचे वीजकंपनीमुळे जळीत झाले होते मात्र विद्युत निरीक्षकाच्या अहवालानुसार पंधरा जणांच्या जळीतास वीजकंपनी जबाबदार आहे. त्यातील निंबाळकर वगळता अन्य शेतकऱ्यांकडून पूर्तता झाली नसलाने विषय प्रलंबित आहे. मात्र निंबाळकर यांच्या रूपाने भरपाई मिळू शकते हे सिध्द झाले आहे. सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी पाठपुरावा करून यासंदर्भातील माहिती जमा केल्याने हे समोर आले आहे.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

उपविभागीय अधिकारी सचिन म्हेत्रे म्हणाले, वीजकंपनीने विशेष नियुक्त केलेल्या विद्युत निरीक्षकांना आम्ही घटनेचा अहवाल अनेक कागदपत्रांसह पाठवितो. ते स्वतः तपासणी करून अहवाल देतात. त्यांच्या अहवालानुसार कंपनी जबाबदार असल्यास शेतकऱ्यांनी कागदपत्रे लवकर सादर केल्यास भरपाई निश्चित मिळू शकते. चेकलिस्ट, फॉर्म अ, फॉर्म क्र. २, उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी, शाखा अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्याचा जबाब, स्केच, विद्युत निरीक्षकाचे पत्र, काम पूर्ण केल्याची उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी, कारवाई अहवालाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची टीपणी.

ऋषिकेश गायकवाड म्हणाले, दररोज जळीताच्या घटना घडून लाखो रूपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करावीत, कारखान्याच्या वतीने स्वतः आम्ही भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यास तयार आहोत. कंपनीनेही तालुकास्तरावर एखाद्या अधिकाऱ्याकडे जळीतासाठीची अतिरीक्त जबाबदारी द्यावी.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

शेतकऱ्याने सादर करावयाची कागदपत्रे

  • १. नुकसान भरपाईचा अर्ज

  • २. तलाठी पंचनामा

  • ३. तालुका कृषी अधिकाऱ्याचे पत्र (ऊस जळून व ठिबक जळून किती नुकसान झाले असा उल्लेख असणारे)

  • ४. कारखान्याचे पत्र ( गट क्रमांक, क्षेत्र, गाळपाचे टनेज, उसाचा दर, जळीतामुळे केलेली कपात, अदा रक्कम अशा माहितीसह)

  • ५. जळीत वर्षाचे व मागील तीन वर्षाची कारखान्याची उसबिले

  • ६. ठिबक संच खरेदी बिल

  • ७. जळीत वर्ष व मागील तीन वर्षेचे सातबारा व पिकपाहणी

  • ८. शासकीय/निमशासकीय/खासगी व अन्य संस्थेकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, भविष्यात घेणार नाही. मी किंवा माझ्या वारसाने त्यासाठी अर्ज केला नाही/करणार नाही. अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र

  • ९. जळीत क्षेत्रासह शेतकऱ्याचा फोटो

loading image
go to top