रिपब्लिकन पक्षाचे आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज पूर्ण झाली. लाखो कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठा मंडप आणि मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. 

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रविवारी (ता.27) एसएसपीएमएस मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आज पूर्ण झाली. लाखो कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठा मंडप आणि मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. 

पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांनंतर पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी येणार असल्याने त्या दृष्टीने अधिवेशनाचे ठिकाण निवडण्यापासून ते भव्य सभामंडप, मोठे व्यासपीठ, मोठमोठ्या कमानी करण्यावर भर दिला आहे. पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, टॅंकर यांसारख्या सुविधा ठेवल्या आहेत. 

कार्यकर्त्यांसाठी बसची व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना थेट अधिवेशनाच्या ठिकाणी पोचता यावे, यासाठी प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलकही लावले आहेत. शहरात सर्वत्र फ्लेक्‍स, बॅनर, झेंडे लावून अधिवेशनासाठीची वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये पक्षनेत्यांचे "पक्षाची भविष्यातील वाटचाल व आगामी निवडणुकीतील भूमिका' या विषयावर अल्पबचत भवन येथे विचारमंथन होणार असल्याचे पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. 

बापट, शिरोळे, काकडे राहणार उपस्थित 
रामदास आठवले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होईल. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे उपस्थित राहणार आहेत. 

स्वागत कमानींना साहित्यिकांची नावे 
आंबेडकरी चळवळ व पक्षासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिकांसह पक्षाच्या नेत्यांना अधिवेशनाद्वारे अभिवादन केले जाणार आहे. व्यासपीठाला दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे; तर स्वागत कमानींना दिवंगत साहित्यिक नामदेव ढसाळ, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. रामनाथ चव्हाण व पक्षाच्या नेत्या लतिका साठे यांची नावे दिली आहेत. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते महिनाभरापासून कार्यरत आहेत. कोपरा सभा, बैठकांद्वारे लोकांपर्यंत पोचलो आहे. लाखो कार्यकर्ते अधिवेशनाला येतील. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्‍यक काळजी घेतली आहे. 
- बाळासाहेब जानराव, राज्य सचिव, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)

Web Title: Republican Party session in Pune