लडाखमध्ये पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र;समिती करणार दौरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे विद्यापीठाने तेथे शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी चाचपणी केली होती, तसा ठरावही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही मांडण्यात आला होता. लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनीही संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी लडाखला भेट द्यावी अशी विनंती केली होती.
 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लडाख येथे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. तेथील अभ्यासक्रमाची माहिती घेऊन हे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची समिती लडाख दौऱ्यावर जाणार आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील 'कलम 370' रद्द केल्यानंतर या भागात शैक्षणीक संस्था, उद्योग सुरू करण्यासाठी व या भागात गुंतवणूक करण्यासाठी दरवाजे उघडले आहेत. यामुळे या भागाचा आर्थिक विकास, रोजगार व शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहे. देशातील अनेक शिक्षण संस्थांनीही जम्मू काश्‍मीरमध्ये जाण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्याच प्रमाणे केंद्राने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्याने त्या भागातही मोठ्या प्रमाणात विकासाची पाऊले उचलली जात आहेत.

पुणे विद्यापीठाने तेथे शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी चाचपणी केली होती, तसा ठरावही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही मांडण्यात आला होता. लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनीही संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी लडाखला भेट द्यावी अशी विनंती केली होती.

त्यानुसार पुणे विद्यापीठाने संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी कुलगुरू करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्यामध्ये विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांचा समावेश आहे. 15 नोव्हेंबर पूर्वी ही समिती लडाखचा दौरा करणार असून, तेथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठीची प्रक्रिया मार्गी लावली जाणार आहे.

कृषी, भूशास्त्रविषयावर संशोधन
लडाखमधील संस्थांच्या मदतीने पुणे विद्यापीठ हिमनदी, भूशास्त्र, कृषी व जैविक शेती, नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयावर संशोधन करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ याची माहिती विद्यापीठाने मागविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research Center of Pune University in Ladakh