#ResearchFellowship संशोधकांच्या फेलोशिपमध्ये वाढ

मीनाक्षी गुरव
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - विज्ञान आणि तंत्रज्ञानात पीएच. डी. करणाऱ्या संशोधकांची फेलोशिप तब्बल २४ ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार कनिष्ठ संशोधकांना दर महिना ३१ हजार रुपयांची, तर वरिष्ठ संशोधकांना दर महिना ३५ हजार रुपयांची फेलोशिप मिळणार आहे. मात्र, ही वाढ अपेक्षाभंग करणारी असल्याचे सांगून भावी शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली.

पुणे - विज्ञान आणि तंत्रज्ञानात पीएच. डी. करणाऱ्या संशोधकांची फेलोशिप तब्बल २४ ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार कनिष्ठ संशोधकांना दर महिना ३१ हजार रुपयांची, तर वरिष्ठ संशोधकांना दर महिना ३५ हजार रुपयांची फेलोशिप मिळणार आहे. मात्र, ही वाढ अपेक्षाभंग करणारी असल्याचे सांगून भावी शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली.

देशातील जवळपास एकूण सव्वा लाख संशोधकांना या फेलोशिपच्या वाढीचा लाभ घेता येणार आहे. पीएच. डी. करणाऱ्या संशोधकांसाठी असणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठी देशभरातील भावी शास्त्रज्ञ दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत होते. पुण्यातही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मूक मोर्चा, मानवी साखळी याद्वारे भावी शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने फेलोशिपमध्ये वाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला.केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता कनिष्ठ संशोधकांच्या फेलोशिपमध्ये दर महिना तब्बल सहा हजार, तर वरिष्ठ संशोधकांच्या फेलोशिपमध्ये तब्बल सात हजारांची वाढ मिळणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये फेलोशिपमध्ये वाढ केली होती. मात्र, फेलोशिपच्या रकमेतील ही वाढ मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्प असल्याने आणि केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधकांसाठी लागू असल्याने संशोधक नाराजी व्यक्त करीत आहेत.

पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेणार - रिसर्च फेलो
‘‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने फेलोशिपमध्ये केलेली वाढ ही खूपच कमी आहे. सध्या केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधकांच्या फेलोशिपमध्ये वाढ केली आहे. मात्र, सर्व विद्याशाखांमधील संशोधकांच्या फेलोशिपमध्ये ८० टक्‍क्‍यांनी वाढ व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयात फेरबदल करून सुधारित निर्णय जाहीर करावा, असे निवेदन संबंधित सचिव आणि मंत्र्यांना भेटून देण्यात आले आहे. आमच्या मागणीनुसार निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल,’’ असे रिसर्च स्कॉलर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रतिनिधी आणि समन्वयक  निखिल गुप्ता यांनी सांगितले.

नवी फेलोशिप (दर महिना रुपयांत) 
  संशोधक : २०१९ : २०१८ (२०१४ पासून २०१८ पर्यंत)
  कनिष्ठ संशोधक :३१,००० : २५,०००
  वरिष्ठ संशोधक : ३५,००० : २८,०००
  संशोधक सहायक - १ : ४७,००० : ३६,०००
  संशोधक सहायक- २ : ४९,००० : ३८,०००
  संशोधक सहायक-३ : ५४,००० : ४०,०००
  उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधकांची संख्या : अंदाजे १.२५ लाख

Web Title: Research Fellowship Increase