'इस्रो'च्या मोहिमांना मिळणार पुणे विद्यापीठाच्या संशोधकांची 'आण्विक' साथ!

सम्राट कदम
Wednesday, 4 December 2019

अवकाश मोहिमांमधील गॅस सेन्सरसाठी आणि खोल समुद्रात विजेरी साठी या आण्विक घटाचा वापर होणार आहे.

पुणे : अवकाश मोहिमांमध्ये जास्त कालावधीसाठी ऊर्जेची पूर्तता हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वच मोहिमांमध्ये प्रामुख्याने सौरऊर्जेचा वापर केला जातो. सौरऊर्जेचा पर्याय म्हणून दूर अंतरावरच्या आणि जिथे सूर्यप्रकाशाची नाही अशा अवकाश मोहिमांसाठी आण्विक ऊर्जेचा (न्यूक्‍लिअर एनर्जी) वापर करता येईल का? याचा विचार इस्रोचे संशोधक करत होते. शास्त्रज्ञांची ही महत्त्वपूर्ण गरज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील संशोधकांनी पूर्ण केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

भौतिकशास्त्र विभागातील प्रा.संजय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आंबादास फटांगरे या संशोधक विद्यार्थ्याने हा प्रकल्प पूर्ण केला. प्रा. वसंत बोरासकर, प्रा. प्रमोद काळे, प्रा. शैलेंद्र दहिवले, प्रा. भूषण पाटील, विभाग प्रमुख प्रा. सुरेश गोसावी, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) विद्यापीठ सेलचे प्रमुख डॉ. एम.सी. उत्तम यांनी नुकताच संपूर्ण प्रकल्प इस्त्रोकडे सुपूर्त केला. 

- अभिमानास्पद : सुंदर पिचाई यांच्याकडे आता गुगल 'अल्फाबेट'चीही जबाबदारी

प्रा. ढोले म्हणाले, ''तीन प्रकाराच्या आण्विक विद्युत घटांची निर्मिती विभागात यशस्वीपणे करण्यात आली. तसेच, विभागातील मायक्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रवेगक प्रयोगशाळेत त्यांची यशस्वी परीक्षण करण्यात आले. यासाठी आवश्‍यक असलेला किरणोत्सारी पदार्थ 'बोर्ड ऑफ रेडिएशन ऍण्ड आयसटोप' या संस्थेकडून विकत घेण्यात आला. सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी लागला.''

खोल समुद्रात आणि अवकाशातील प्रतिकूल परिस्थितीतही हे विद्युत घट चांगले कार्य करतात. याबद्दल बोलताना फटांगरे म्हणाले, ''सध्या वापरात असलेल्या रासायनिक विद्युत घटाला एक परिपूर्ण पर्याय या संशोधनामुळे उपलब्ध झाला आहे. अवकाश मोहिमांमधील गॅस सेन्सरसाठी आणि खोल समुद्रात विजेरी साठी या आण्विक घटाचा वापर होणार आहे.'' 

- पुणे महापालिकेत लेट कमर्सना नोटिस; कोणत्या विभागात झाली कारवाई?

''विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या आण्विक विद्युत घटाची निर्मिती करण्यात आली. आमच्यासाठी ही मोठी उपलब्धी असून दूरवरच्या अवकाश मोहिमांसाठी या विद्युत घटांचा वापर होईल.'' 
- प्रा. वसंत बोरासकर

विद्युत घटांचे प्रकार :- 

1) किरणोत्सारी बीटा पार्टिकलद्वारे अर्धगोलाकार कॅपॅसीटरच्या चार्जींगद्वारे विद्युत घटाची निर्मिती 
2) सिलिकॉन कार्बाइडचा 'नॅनो क्रिस्टल' आणि टिटॅनियम डायऑक्‍साईडच्या 'नॅनोट्यूब'च्या वापरातून शॉटकी जोड प्रकारातील विद्युत घट 
3) हायड्रोजनचे समस्थानिक 'ट्रीटीयम' किरणोत्सारी स्रोत आणि फोटोव्होल्टाईक सौर घटकातून विद्युत घटाची निर्मिती

- ICC Test Rankings : 'किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला 'टॉपर'!

विद्युत घटाची वैशिष्ट्ये :-

- पहिल्या प्रकारातील घटाद्वारे 200 व्होल्ट आणि 0.3 नॅनो ऍम्पिअरच विद्युत धारा. 
- दुसऱ्या प्रकारातील घटाद्वारे 1.47 व्होल्ट आणि 0.1 मायक्रो ऍम्पिअरच विद्युत धारा. 
- तिसऱ्या प्रकारातील घटाद्वारे 5.44 व्होल्ट आणि 1 मायक्रो ऍम्पिअर विद्युत धारा. 
- उणे 40 अंश सेल्सिअस ते 85 अंश सेल्सिअस तापमानातही विद्युत घट कार्य करतो.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research of Pune University scientist will be helpful to ISRO