पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार संशोधन 

मंगळवार, 30 जून 2020

पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी  पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.  त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. 

पुणे - एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्‍लस्टर'च्या माध्यमातून काम करत आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बंगळुरु, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्‍लस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेने कोरोना संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आहे.त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेली नाही, अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच कचऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

"नॉलेज क्‍लस्टर'च्या सूचनेनुसार नियोजन 
पुण्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासह महापालिकेने कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्‍लस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्‍लेषण करून कोरोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे.