पुणेकरांनी शोधली 'करावली'

पुणे
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातून आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी एका नवीन वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीचे नाव कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या नावावरून 'करावली' असे ठेवण्यात आले आहे. त

पुणे : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातून आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी एका नवीन वनस्पतीचा शोध घेतला आहे. या वनस्पतीचे नाव कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या नावावरून 'करावली' असे ठेवण्यात आले आहे. तसेच याचे शास्त्रीय नाव 'एरिओकोलॉन कारावलेन्स' असे ठेवले आहे. किनारी भागात आढळणाऱ्या गेंद (एरीओकोलॉन) या प्रजातीमधील ही वनस्पती आहे. फिनलंड येथील आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात नुकताच हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

'एरिओकोलॉन' ही वनस्पतींची प्रजाती जगाच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये पसरली आहे आणि जगात तिच्या चारशे जाती आढळून येतात. यातील 104 जाती भारतात आढळतात. पश्‍चिम घाटात यापैकी 60 जाती आढळतात; तर पूर्व हिमालयात विशेषतः मेघालयामध्ये 40 जाती आढळतात. मेघालयामध्ये या जाती फुलांचा गुच्छ आणि इतर सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी वापरल्या जातात, अशी माहिती आघारकर संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. रितेश कुमार चौधरी यांनी दिली. 

डॉ. रितेश चौधरी यांच्याबरोबर डॉ. मंदार दातार, डॉ. शुभदा ताम्हनकर आणि अश्विनी दारशेतकर या प्रकल्पामध्ये सहभागी झाले होते. कर्नाटकमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. राव आणि केरळचे डॉ. के. एम. प्रभुकुमार यांनीही या प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

वनस्पतीचे वैशिष्ट्ये 
- "एरिओकोलॉन कारावलेन्स" किनारी भागात पावसाळी डबक्‍यांमध्ये वाढते. 
- हिची फुले पांढरी असून पावसाळा संपायच्या आत बीजप्रसार करून या वनस्पती मरून जातात. 
- रस्त्याकडेची डबकी हा त्यांचा अधिवास असल्याने ही वनस्पती वाचवण्यासाठी या छोट्या अधिवासांचीही काळजी घेणे गरजेचे 

"संशोधकांनी या प्रकल्पासाठी देशभर सर्वेक्षण करून एरिओकोलॉनचे पाचशेहून अधिक नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास केला. केवळ सूक्ष्मदर्शकातच या फुलांचा अभ्यास करता येतो, इतकी ती सूक्ष्म असतात. डीएनएवर आधारित वंशावळींचा अभ्यास करून या प्रजातीच्या उत्क्रांती संदर्भात गृहीतके मांडली आहेत. जगभरात "डीएनए'च्या वंशावळीवरून या वनस्पती प्रजातीचा अभ्यास पहिल्यांदाच होतो आहे. आम्ही या संदर्भात ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि चीनमधील इतर गटांशी संपर्कात राहून अभ्यासाचा मागोवा घेत आहोत. आघारकर संशोधन संस्थेने या आधीही एरिओकोलॉनची एक नवी जात महाराष्ट्रातून शोधली आहे.'' 
- डॉ. मंदार दातार, वनस्पती अभ्यासक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers from Pune discovered rare plants in Karnataka