वाहतुकीसाठी पूर्वीइतकीच जागा राखीव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

नव्या योजनेमुळे कोंडी होत असल्याच्या तक्रारींत नाही तथ्य
पुणे - जंगली महाराज रस्त्याच्या फेरआखणीची योजना आखताना वाहनांना वाहतूक करण्यासाठी असलेली जागा कमी करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या नव्या नियोजनात मूळ ३० मीटरपैकी निम्मा भाग वाहनांसाठी खुला राहणार आहे. त्यामुळे पादचारी, सायकलींसाठी जागा राखून ठेवण्याच्या या योजनेमुळे वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. 

वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या जंगली महाराज रस्त्याची मूळ रुंदी ३० मीटरची असून, त्यापैकी १५ मीटरचा भाग हा वाहनांच्या वाहतुकीसाठी नियोजित आहे. वाहने आणि पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेता अशा रस्त्यांवर राष्ट्रीय नागरी परिवहन धोरण (अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्स) आणि सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार पादचाऱ्यांसाठी, तसेच सायकल योजनेसाठी विविध सेवासुविधा उभारण्याचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर जंगली महाराज रस्त्यावर ही योजना राबविण्यात येत आहे. तिच्या माध्यमातून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्त्यावरून ये-जा करता यावी, याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाच-पाच मीटर रुंदीचे पदपथ उभारण्यात येत आहेत. तसेच रस्त्याच्या एकाच बाजूला दोन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक आणि एक मीटर रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. 

पादचाऱ्यांना या सुविधा पुरविताना वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्याची रुंदी मात्र कमी करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या १५ मीटरच्या भागातून पूर्वीप्रमाणे वाहनांची वाहतूक सुरू राहणार आहे. त्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘पीएमपी’च्या बसगाड्याकरिता स्वतंत्र मार्ग (लेन) आखला आहे. अन्य तीन मार्ग इतर वाहनांसाठी आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा चुकीचा असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘पूर्वी ३० मीटर रस्त्यावर वाहतुकीसाठी १५ मीटरमध्ये चार मार्ग होते. ही योजना राबविल्यानंतरही वाहतुकीचा रस्ता कायम असून, योजनेच्या मूळ आराखड्यानुसार कामे करण्यात येत आहेत. बसगाड्यांसाठी केलेल्या स्वतंत्र मार्गाचाही फायदा होईल.’’

 मूळ रस्त्याची रुंदी : ३० मीटर
 वाहतुकीसाठी रस्ता : १५ मीटर
 पदपथ : रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ मीटर
 सायकल ट्रॅक : २ मीटर 
 रस्त्याचे सुशोभीकरण १ मीटर
 इतर कारणांसाठी वापर : २ मीटर

Web Title: reserve place for transport