आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनाच संधी द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांत ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच आरक्षणाच्या धर्तीवर इच्छुकांना संधी द्यावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांद्वारे करण्यात येऊ लागली आहे. नागरिकांच्या मागास प्रवार्गात (ओबीसी) कुणबी किंवा मराठा समाजातील इच्छुकांना संधी देऊ नये, अशीही मागणी करण्यात येत आहे.

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांत ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच आरक्षणाच्या धर्तीवर इच्छुकांना संधी द्यावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांद्वारे करण्यात येऊ लागली आहे. नागरिकांच्या मागास प्रवार्गात (ओबीसी) कुणबी किंवा मराठा समाजातील इच्छुकांना संधी देऊ नये, अशीही मागणी करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभाग आहेत. त्यातून १६२ जागांसाठी निवडणूक होणार आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी (एससी) २२, अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ४४ जागा आरक्षित आहेत, तर खुल्या प्रवर्गासाठी ९४ जागा आहेत.   
या पार्श्‍वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये खुल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातील इच्छुकांनीही दावा केला आहे. ओबीसींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून कुणबीचे प्रमाणपत्र असलेल्या मराठा समाजातील इच्छुकांनीही दावा केला आहे. काही विद्यमान नगरसेवकांनी खुल्या आणि ओबीसी प्रवार्गातूनही दावा केला आहे. मूळच्या ओबीसी समाजातील इच्छुकांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. ज्या आरक्षणाचा प्रकार आहे, त्याच प्रवर्गातील इच्छुकांना संधी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी केली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीही प्रभागातील जागा आरक्षित आहेत. तरीही काही ठिकाणी महिलांनीही खुल्या जागेवर दावा केला आहे. त्याबद्दलही आक्षेप घेण्यात येत आहे. काही प्रभागांतील आरक्षण अनेक वर्षांनंतर बदलले आहे. त्यामुळेही यापूर्वी थांबलेले इच्छुक आता लढण्याच्या तयारीत आहेत. आरक्षणानुसार उमेदवार निश्‍चित केले, तर आरक्षणाचा उद्देश साध्य होईल, असाही युक्तिवाद त्यासाठी करण्यात येत आहे.

सर्वांना संधी मिळावी, यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणानुसारच उमेदवार द्यायला हवेत. खुल्या गटातील आणि आरक्षित प्रवार्गातील इच्छुकांवर अन्याय होणार नाही. याबाबतच्या नियमांचे सर्वच राजकीय पक्षांनी पालन करायला हवे.
- बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस नेते

अनेक प्रभाग हे प्रदीर्घ कालावधीनंतर खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तेथे खुल्या प्रवार्गातील संबंधित गटांनुसारच उमेदवार द्यायला हवेत. आरक्षित गटातून उमेदवारी निश्‍चित करताना संबंधित प्रवर्गाच्याच इच्छुकाला संधी द्यायला हवी.
- संदीप खर्डेकर, भाजप शहर उपाध्यक्ष

महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी खुल्या असलेल्या प्रवर्गात ओबीसींमधून घुसखोरी होत आहे. कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांना आमचा विरोध नाही; परंतु त्यांना त्या-त्या आरक्षित प्रवर्गातूनच उमेदवारी द्यायला हवी. अन्यथा अनेकांवर अन्याय होऊ शकतो. सर्वांना समान संधी देण्यासाठी संबंधित आरक्षित प्रवर्गांच्या नियमांचे पालन राजकीय पक्षांनी करायला हवे.
- वासुदेव भोसले, कार्यकर्ता

Web Title: Reserved category candidates give opportunity