महात्मा फुलेंच्या खानवडीत मुलींसाठी निवासी मॉडेल स्कूल

 Residential Model School for Girls in Mahatma Phule Khanwadi
Residential Model School for Girls in Mahatma Phule Khanwadi

पुणे : खानवडी (ता. पुरंदर) हे थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मूळ गाव. फुले दाम्पत्याने पुण्यात 1848 मध्ये मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. यामुळे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात येता आले. फुले दांपत्याच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले यांच्या खानवडीत मुलींसाठी निवासी मॉडेल स्कूल उभारण्याचा संकल्प पुणे जिल्हा परिषदेने केला आहे. ही जिल्ह्यातील एकमेव शाळा असणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेचेच जिल्हास्तरीय निवासी शाळेत रूपांतर केले जाणार आहे. पा पथदर्शी उपक्रम असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा 

केंद्रीय नवोदय विद्यालय, केंद्रीय शाळा, सातारा येथील सैनिकी शाळा आणि वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील आंतरराष्ट्रीय शाळेच्या धर्तीवर या निवासी शाळेची उभारणी केली जाणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नियोजित निवासी शाळेसाठी आवश्‍यक जागा, बांधकामासाठीचे अंदाजपत्रक, प्रवेश क्षमता आदींचा समावेश केला जाणार आहे. या शाळेच्या उभारणीसाठी राज्य सरकार, विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

राज्यात सद्यःस्थितीत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. यापैकी काही शाळा मुलींसाठीच्या आहेत. मात्र या शाळांची अवस्था अन्य सरकारी शाळांप्रमाणेच आहे. त्यामुळे या शाळांमधून फारसे दर्जेदार शिक्षण मिळत नाही. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचीही काहीशी अशीच स्थिती झाल्याचा संदेश समाजात गेला आहे. हा संदेश खोडून टाकण्याच्या उद्देशाने तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 100 शाळांची इंटरनॅशनल स्कूल म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी (ता. शिरूर) समावेश आहे.

दरम्यान, या नियोजित निवासी शाळेसाठीच्या नियोजित जागेची पाहणी करण्याचा
आणि त्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी
अभियंत्यांना दिला आहे. या पाहणीनंतर याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात
येणार आहे.

निवासी शाळेतील संभाव्य सुविधा
- मुलींच्या निवासासाठी सुसज्ज वसतिगृह.
- जेवणाच्या सुविधेसाठी प्रशस्त भोजनगृह.
- शाळेसाठी अत्याधुनिक पद्धतीची भव्य-दिव्य इमारत.
- अध्ययनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर


''ही निवासी शाळा जिल्हास्तरीय असेल. यामुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांतील मुलींना अत्याधुनिक पद्धतीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये घटनेतील तरतुदीनुसार सर्व प्रवर्गातील मुलींच्या प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय शाळा, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांच्या धर्तीवर या शाळेचा हा पथदर्शी प्रकल्प असेल.''
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.


''ही निवासी शाळा गोरगरीब मुलींसाठी वरदान ठरेल. मात्र ही शाळा किमान पहिली ते बारावीपर्यंतची असावी. त्यातही दहावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा असावी. यामुळे ग्रामीण भागातील मुली स्पर्धेच्या युगात टिकून राहतील. पर्यायाने त्यांच्यात न्यूनगंड येणार नाही.''
- दीक्षा धिवार (विद्यार्थिनी)खानवडी, ता. पुरंदर.


''शेतमजूर, वीटभट्टी कामगार आणि ऊसतोड कामगारांना अनेकदा रोजगारासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे या कामगारांच्या मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांसोबत भटकंती करावी लागते. परिणामी याचा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. या निवासी शाळेमुळे या मुलांची भटकंती थांबेल आणि त्यांना शिक्षणही मिळू शकेल.''
- संयुक्ता कादबाने (विद्यार्थिनी) खळद, ता. पुरंदर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com