शिवाजीराव भोसले बॅंकेवर निर्बंध

शिवाजीराव भोसले बॅंकेवर निर्बंध

पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, बॅंकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना केवळ एक हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम काढता येणार आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. 

 रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार खातेदार आणि ठेवीदारांना कोणत्याही ठेव, बचत किंवा चालू खात्यातून एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देण्यास मान्यता देता येणार नाही. तसेच, नवीन ठेवी स्वीकारण्यास, गुंतवणुकीला, कर्जाची परतफेड किंवा नूतनीकरण करण्यास परवानगी देता येणार नाही. बॅंकेला कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावता येणार नाही, असे रिझर्व्ह बॅंकेच्या उप महाप्रबंधक शैलजा सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे. सद्यस्थितीत बॅंकिंग परवाना रद्द करण्यात येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार बॅंकेला व्यवहार चालू ठेवता येतील.  दरम्यान, बॅंक अडचणीत आल्यामुळे खातेदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. आर्थिक लेखापरीक्षणात बॅंकेला २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये ‘अ’ वर्ग तर २०१६-१७ मध्ये ‘ड’ वर्ग देण्यात आला होता.

दोषींवर जबाबदारी निश्‍चित करणार
बॅंकेने पुरेसे तारण न घेता सुमारे ७३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. थकीत रकमेमुळे काही कर्जे ‘एनपीए’मध्ये गेली आहेत. याबाबत सहकार खात्याने कलम ८८ नुसार बॅंकेच्या संचालकांसह ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना नुकतीच नोटीस बजावली आहे. संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर दोषींवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.

बॅंकेवरील निर्बंध लवकरात लवकर उठविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही बॅंकेच्या नावाच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. ठेवीदार-खातेदारांना त्यांच्या संपूर्ण रकमा परत करण्यात येतील. अडचणीच्या काळात सर्व ठेवीदार आणि खातेदारांनी संयम बाळगून सहकार्य करावे.
- अनिल भोसले,  सभासद व माजी अध्यक्ष, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक

ठेवीदारांनी संयम बाळगावा. कर्जांची वसुली होईल तशी बॅंकेच्या रोख तरलतेमध्ये वाढ होईल. त्यानंतर ठेवीदारांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ होईल. एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. वैद्यकीय, शैक्षणिक आणि तातडीच्या गरजा भागविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीने एक लाख रुपयांपर्यंत रक्‍कम मिळू शकते. 
- विद्याधर अनास्कर, बॅंकिंग तज्ज्ञ

बॅंकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरुद्ध सहकार खाते आणि रिझर्व्ह बॅंकेकडे गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यांनी वेळीच दखल घेऊन चौकशी केली असती तर ठेवीदार-खातेदारांवर ही वेळ आली नसती. या प्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 
- सुधीर आल्हाट,  सभासद, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com