शिट्टी वाजली अन्‌ निकाल लागला...! 

review-election-logo
review-election-logo

सार्वत्रिक निवडणुका या लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्यातच महापालिका निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. पूर्वी या निकालासाठी पहाटेपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी असायची. सकाळी सुरू झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवसांपर्यंत सुरू राहायची. काळ बदलला आणि अर्धा ते एक तासात निकाल समजू लागला. ही किमया इलेक्‍ट्रॉनिक यंत्राने (मशिन) केली असून आता मशिनची शिट्टी वाजते आणि निकाल लागतो. 

पुणे महापालिका निवडणुकीचा इतिहास मोठा रंजक आहे. सन 1852 मध्ये पहिली महापालिका निवडणूक झाली. सन 1950 मध्ये नगरपालिकेची महापालिका झाली होती. मतदान करण्याच्या अधिकारातही बदल झाला. या निवडणुकीत मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तरी मतपत्रिका आणि मतमोजणीच्या पद्धतीत कोणताही बदल झाला नव्हता. पारंपरिक पद्धतीने या दोन्ही गोष्टी सुरू होत्या. अगदी 2006 पर्यंत हे चित्र होते. सन 2007 च्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रथम मशिनचा वापर केला गेला आणि मतदान आणि मतमोजणीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. 

पूर्वी शहरातील पाच टक्के लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. हळूहळू त्यात बदल होत गेला आणि मतदारांची संख्या वाढत गेली. मतदानासाठी 21 वर्षांची वयाची अट शिथिल करून 18 करण्यात आली. शहरांचा विस्तार झाला. लोकसंख्याही झपाट्याने वाढली. तशी वॉर्डांची आणि सभासदांची संख्याही वाढत गेली. 

मतदान आणि मतमोजणीसाठी आज मशिन आले. एवढेच नव्हे, तर नकाराधिकाराचा वापर करता येईल, अशा सोयी उपलब्ध झाल्या आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत काय ट्रेंड आहे, हे समजू लागले. त्यातून उमेदवार, मतदारांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही कमी झाला. पूर्वी वॉर्ड पद्धतीने होणाऱ्या निवडणुका दोन, तीन आणि आता चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका घेणे सोपे झाले. 

यापूर्वी 2002 मध्ये तीन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी मशिनचा वापर करण्यात आला नव्हता. या निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत पहाट झाली होती. 

मशिनमुळे पारदर्शकता 
फेरमतमोजणीची मागणी झाल्यानंतर मतमोजणी करण्यासाठी पुन्हा किती काळ लागेल हे सांगता येत नसे. आज मशिनमुळे अधिक पारदर्शक पद्धतीने मतमोजणी होण्यास सुरवात झाली आहे. हा सकारात्मक बदल सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारल्यामुळे लोकशाहीचा हा सर्वांत मोठा उत्सव विनासायास पार पडत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com