तांदळाच्या निर्यातीत घट

Rice
Rice

पुणे - चालू आर्थिक वर्षातील (२०१८-१९) एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती व बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत १.७० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. डिसेंबरपर्यंत तांदळाची २८.६० लाख टन इतकी निर्यात झाली आहे. या उलट गेल्यावर्षी (२०१७-१८) मध्ये याच कालावधीत बासमती तांदळाची निर्यात २९.१० लाख टन इतकी झाली होती.

किमतीनुसार पाहिले, तर भाववाढ झाल्यामुळे निर्यात घटूनही बासमती तांदळाच्या निर्यातीचे मूल्य गेल्या वर्षीच्या १८ हजार ८००  कोटी रुपयांवरून २१ हजार २०० कोटी रुपये इतके अधिक झाले आहे.

बिगर बासमती तांदळाची निर्यातही गेल्या वर्षीच्या ६५ लाख टनांवरून १४ टक्‍क्‍यांनी घटून या वर्षी ५६ लाख टन इतकी झाली आहे. किमतीनुसार पाहिले तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीचे मूल्यही गतवर्षीच्या १७ हजार ३०० कोटी रुपयांवरून घटून या वर्षी १५ हजार ५३० कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष व जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘तांदळाच्या हमीभावात (एमएसपी) केंद्र सरकारकडून दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य धानासाठीचे भाव १५५० व धान एसाठीचे भाव १५७० वरून वाढून अनुक्रमे १७५० व १७७० रुपयांपर्यंत वाढले. त्यातच डॉलरचे भावदेखील वाढले आहेत. तसेच बिगर बासमती तांदळाच्या भावात मागील वर्षीपेक्षा ६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्याचा फायदा तांदूळ निर्यातीतील भारताचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांना झाला. त्यांनी भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात अधिक निर्यात केली. त्यामुळे आपल्या बासमती व बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली आहे.’’

या वर्षी खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ९९२ लाख टन इतके अपेक्षित आहे. मागील वर्षी ९७५ लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्याचबरोबर बासमती व बिगर बासमती तांदळाचे पीकही उत्तम आहे.

योजनेला अल्प प्रतिसाद
तांदळाच्या निर्यातीतून परकीय चलन मिळते. म्हणून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी शासनाने नोव्हेंबरमध्येच मर्चेंडाइन एक्‍स्पोर्ट फोरम इंडिया ही योजना सुरू केली. त्याअंतर्गत बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर पाच टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे; पण त्याला तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही, असेही शहा यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात बिगर बासमती तांदळाची निर्यात ८० लाख टन इतकी होईल असा अंदाज आहे. हा अंदाज वर्षाच्या सुरवातीस ९० लाख टन इतका होता, तर बासमती तांदळाची निर्यात चालू आर्थिक वर्षात मागील वर्षीइतकीच म्हणजे ४० लाख टन इतकी होईल, असा अंदाजही शहा यांनी या वेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com