नोटाबंदीमुळे तांदळाची निम्मीच आवक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

यंदाचा हंगाम उशिरा सुरू; पुढील आठवड्यात तांदूळ महोत्सव
पुणे - नोटाबंदीमुळे यंदा तांदळाचा नवीन हंगाम उशिरा सुरू होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात यंदा निम्मीच आवक होत आहे. पुढील आठवड्यापासून तांदूळ महोत्सव सुरू होणार आहे.

यंदाचा हंगाम उशिरा सुरू; पुढील आठवड्यात तांदूळ महोत्सव
पुणे - नोटाबंदीमुळे यंदा तांदळाचा नवीन हंगाम उशिरा सुरू होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात यंदा निम्मीच आवक होत आहे. पुढील आठवड्यापासून तांदूळ महोत्सव सुरू होणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नवीन तांदळाची आवक सुरू होते. साधारणपणे वर्षाअखेर आणि जानेवारीच्या सुरवातीलाच तांदळाचा नवीन हंगाम सुरू होतो. मात्र, यंदाच्या हंगामावर नोटाबंदीचा परिणाम दिसत आहे. हंगामात साधारणपणे 40 ते 50 ट्रक इतका तांदूळ बाजारात येतो. हे प्रमाण सध्या 20 ट्रक आहे. पंजाब, हरियानात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या उत्पादन क्षेत्रातील तांदळाच्या मोठ्या मिलवाल्यांनी चढ्या भावांत भाताची खरेदी केली. शेतकऱ्यांना धनादेश मिळाले असले तरी रक्कम काढून घेण्यावर असलेल्या मर्यादेमुळे आर्थिक अडचण जाणवत आहे. यामुळे शेतकरी बाजारात कमी प्रमाणात माल पाठवीत असल्याचे व्यापारी राजेश शहा यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना पैसे काढण्याची मर्यादा वाढविली तर निश्‍चितच फरक पडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातून तांदळाची मागणी वाढली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये उत्पादित होणारा तांदूळही विक्रीला पाठविला जात आहे. निर्यातीची मागणी वाढली आहे, त्याचवेळी तांदूळ मिलवाल्यांनी खरेदी सौद्याचा कालावधी एक महिना केल्याने त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पारंपरिक बासमती तांदळाचे उत्पादन घटल्याने त्याचे भाव दहा ते वीस टक्‍क्‍यांनी जास्त निघाले असल्याकडे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी सांगितले, त्यामुळे पुढील काळात तांदळाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी दिसत नाही. कोलम, आंबेमोहोर, इंद्रायणी, सोनामसुरी, स्वर्णमसुरी, सुरती कोलम, काली मुछ, सेला आदी प्रकारच्या तांदळाची आवक सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून तांदूळ महोत्सव सुरू होतात; परंतु यंदा नोटाबंदी आणि कमी उत्पादन, निर्यातीच्या वाढत्या मागणीचा परिणाम तांदळाच्या बाजारावर पडला आहे.

Web Title: rice import decrease by currency ban