कॅबच्या धर्तीवर आता रिक्षांसाठी ॲप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - कॅब कंपन्यांच्या धर्तीवर रिक्षाची सेवा प्रवाशांना मिळावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना हमखास आणि किफायतशीर सेवा देण्यासाठी ‘ॲप’च्या माध्यमातून शहरातील सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना जोडण्याच्या प्रकल्पावर ‘आरटीओ’ने काम सुरू केले आहे. 

पुणे - कॅब कंपन्यांच्या धर्तीवर रिक्षाची सेवा प्रवाशांना मिळावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना हमखास आणि किफायतशीर सेवा देण्यासाठी ‘ॲप’च्या माध्यमातून शहरातील सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना जोडण्याच्या प्रकल्पावर ‘आरटीओ’ने काम सुरू केले आहे. 

जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवासी भाड्यावरून ग्राहकांशी वाद घालणे आदी प्रकार रिक्षाचालकांकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे कॅब कंपन्यांकडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे. त्यातच ‘ओला’ने येत्या वर्षांत पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये दहा हजार ई-रिक्षा आणण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्यात शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सुमारे आठ हजार रिक्षाचालक कॅब कंपन्यांचे भागीदार झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांपुढे स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आरटीओ’च्या माध्यमातून ॲप तयार करायचे आणि प्रवाशांना सेवा द्यायची, असा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे भाडे नाकारणे, प्रवासी भाड्यावरून वाद घालणे आदी प्रकारांना आळा बसेल, अशी ‘आरटीओ’ची अपेक्षा आहे. ‘आरटीओ’ने त्यासाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची दोनदा बैठक घेतली. तिसरी बैठक गुरुवारी (ता. १९) होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात ६० हजारपैकी जास्तीत जास्त रिक्षांना सामावून घेण्यात येणार आहे. या ॲपवर ‘आरटीओ’ची देखरेख असेल. त्यामुळे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणे शक्‍य होईल, अशी शक्‍यता आहे. 

ॲप तयार करणारी एजन्सी निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्षाचालकांची माहिती आरटीओकडे आहेच. त्याचा समावेश ॲपमध्ये करण्यात येणार आहे. ॲप उपलब्ध होण्यासाठी किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 

रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या हितासाठी ‘आरटीओ’ने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्याबाबत संघटनेची आरटीओशी चर्चा सुरू आहे. रिक्षाचालकांसाठी ते सोयीचे असावे, अशी आमची भूमिका आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असावी. 
- नितीन पवार, रिक्षा पंचायत

रिक्षाचालकांनी जवळचे किंवा लांबचे अंतर, यासाठी भाडे नाकारू नये, दर निश्‍चित असावे आणि त्यानुसारच पैसे घ्यावेत, ही प्रवासी म्हणून किमान अपेक्षा आहे. ‘आरटीओ’च्या ॲपच्या माध्यमातून तसे होणार असेल, तर प्रवासी म्हणून आम्ही निश्‍चितच त्याचे स्वागत करू.  
- आरती देशपांडे, प्रवासी

ग्राहकांना रिक्षासेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ॲप तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून रिक्षाचालकांनाही हमखास व्यवसाय उपलब्ध होईल आणि ग्राहकांना सेवा मिळेल. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: rickshaw app rto