रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत - डॉ. प्रवीण मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘सकाळ माध्यम समूह व लायन्स क्‍लबच्या वतीने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रवाशांच्या जिवावर बेतणारी परिस्थिती उद्‌भवल्यास प्रथमोपचार पेटीचा निश्‍चितच फायदा होईल; तसेच रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे,’’ असे मत वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या कार्यालयात रिक्षांमध्ये बसविण्यासाठी प्रथमोपचार पेट्यांचे वाटप नुकतेच रिक्षाचालकांना करण्यात आले; तसेच रिक्षातून उतरताना प्रवाशांनी स्वत:चे साहित्य घेतल्याची खात्री करावी, अशा आशयाचे स्टिकर रिक्षांवर लावण्यात आले. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, लायन्स क्‍लबचे माजी प्रांतपाल राज मुछाल, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, माधुरी अभंग, वैभवी रावळ, गोविंद राठी, विजय सारडा, परमानंद शर्मा, विनिता गुंदेचा, प्रतीक केला आदी या वेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांना पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. रिक्षा सुस्थितीमध्ये असल्यास संभाव्य अपघात टळतील. प्रवाशांकडून नियमानुसार मीटर पद्धतीने भाडे घेतल्यास होणारे वाद थांबतील; तसेच रिक्षाचालकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.’’ सुतार म्हणाले, ‘‘शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी वाहनचालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. रिक्षांमध्ये लावलेल्या प्रथमोपचार पेट्यांचाही प्रवाशांना निश्‍चितच उपयोग होईल.’’

प्रथमोपचार पेटी प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी रिक्षाचालकांनी बसवावी. लायन्स क्‍लबतर्फे महिन्यातून एकदा या पेट्यांची तपासणी करण्यात येईल. रिक्षाचालकांसाठी प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या उपक्रमाला ‘सकाळ’चे सहकार्य मिळत आहे. 
- राज मुछाल, माजी प्रांतपाल, लायन्स क्‍लब’

Web Title: Rickshaw driver keep the traffic rules