रिक्षाचालकाने पळविले पाच लाख 

रिक्षाचालकाने पळविले पाच लाख 

पुणे - पुण्यात घर घेण्यासाठी गावातील घर विकून आणलेले पाच लाख रुपये रिक्षा चालकाने रस्त्यामध्ये लंपास केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत शांताराम पाटील (वय 56, रा. कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील आहेत. पुण्यात ते एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना पुण्यात घर घ्यायचे होते. दिवाळीच्या सुटीला त्यांनी गावी असलेले घर विकून पाच लाख रुपये आणले होते. बुधवारी पहाटे ते शिवाजीनगर बस स्थानकावर पत्नीसह उतरले. त्या ठिकाणाहून कर्वेनगरला घरी जाण्यासाठी त्यांनी शेअर रिक्षा पकडली. रिक्षामध्ये अगोदरच दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्यानंतर दोघेही पती-पत्नी रिक्षात बसले. एक मोठी बॅग त्यांनी रिक्षा चालकाजवळ ठेवली होती. तर, पैशाची बॅग असल्यामुळे ती त्यांनी पत्नीच्या हातात दिली होती. 

रिक्षा चालकाने डेक्कन कॉर्नरला आल्यानंतर मोठ्या बॅगची अडचण होत असल्याचे सांगत ती बॅग मागे घेण्यास लावून दुसरी बॅग त्या ठिकाणी ठेवायला सांगितली. त्यामुळे पाटील यांनी मोठी बॅग पत्नीकडे दिली. पैशाची बॅग त्या ठिकाणी ठेवली. रिक्षातून उतरल्यानंतर पाटील यांनी पैसे तपासले. पण, त्यामध्ये पैसे नसल्याचे आढळून आले. तोपर्यंत रिक्षा चालक पसार झाला होता. त्यानंतर त्यांनी तत्काळ अलंकार पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप बुवा हे अधिक तपास करत आहेत. 

अतिकाळजी घेतल्याने संशय 
पाटील यांच्याकडे रोकड असल्यामुळे ते बसल्यापासून अतिकाळजी घेत होते. त्यामुळे चालकाला त्या बॅगमध्ये काही तरी मौल्यवान असल्याचा संशय आल्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच त्याने डेक्कन कॉर्नर येथे रिक्षा थांबवून पैशाची बॅग त्याच्याजवळ ठेवायला लावली असण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे चालकाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com