रिक्षाचालकांना उन्हाचा तडाखा

प्रवीण खुंटे
गुरुवार, 17 मे 2018

पुणे - शहरातील तापमानाने ४१ अंशांचा पारा ओलांडल्यामुळे नागरिक शक्‍यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडत नाहीत. मात्र, रिक्षाचालकांना उन्हाची तमा न बाळगता बाहेर पडावे लागते. या वाढत्या तापमानामुळे रिक्षाचालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

पुणे - शहरातील तापमानाने ४१ अंशांचा पारा ओलांडल्यामुळे नागरिक शक्‍यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडत नाहीत. मात्र, रिक्षाचालकांना उन्हाची तमा न बाळगता बाहेर पडावे लागते. या वाढत्या तापमानामुळे रिक्षाचालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

उन्हामुळे डोळ्यांची आग होणे, अशक्तपणा जाणवणे, जेवण कमी होणे, सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेला खाज येणे आदी प्रकारचे त्रास होतात. बहुसंख्य रिक्षाचालकांना मूळव्याधीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यामध्ये हा त्रास आणखी वाढतो. वाढलेल्या तापमानामुळे रिक्षाचालकांना काय त्रास होतो, याविषयी शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या सुमारे २५ रिक्षाचालकांशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. या २५ मधील २० रिक्षाचालकांनी मूळव्याधीचा त्रास होत असल्याचे सांगितले. पुणे शहरात रिक्षाचालकांची संख्या जवळपास ६० हजार एवढी आहे.

जवळपास प्रत्येक रिक्षाचालकाला मूळव्याध आणि कंबरेचा त्रास होतोच. उन्हाळ्यात त्रास आणखी वाढतो. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते. आम्ही शहराच्या मध्यवर्ती परिसरात फिरताना पाणी सहज मिळून जाते. परंतु, शहराच्या बाहेरील उपनगरात गेल्यावर मात्र बऱ्याचदा पाणीही मिळत नाही.
- तुकाराम जाधव, रिक्षाचालक

मी सकाळी आठ ते रात्री आठ अशी रिक्षा चालवतो. परंतु, उन्हामुळे दुपारनंतर रिक्षा चालवायला उत्साह राहात नाही. यामुळे खूप चिडचिड होते. एखादे भाडे सोडल्यावर थोडा वेळ सावलीचे ठिकाण बघून थांबावेच लागते. मोठ्या चौकांमध्ये सिग्नलमध्ये अडकल्यास एका मिनिटामध्येच अंगातून घामाच्या धारा वाहतात.
- दीपक कदम, रिक्षाचालक

रिक्षाचालक उन्हात जास्त फिरत असल्यामुळे त्यांना उष्माघात होण्याची शक्‍यता असते. एखाद्या रिक्षाचालकाला डायबेटीजसारखे आजार असल्यास जास्त त्रास होतो. मायग्रेनचा त्रास, त्वचेला खाज येणे, यामुळे इन्फेक्‍शन होऊ शकते. यासाठी रिक्षाचालकांनी पाण्याबरोबरच नीरा, लिंबू पाण्यासारखे द्रवपदार्थ पिण्याची नितांत गरज आहे.
- डॉ. स्वरूप लडकत, एमडी, होमिओपॅथी

Web Title: rickshaw driver summer temperature