रिक्षाचालकांकडून नियम धाब्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पिंपरी - मोरवाडीकडून इंदिरा गांधी पुलावर जाण्यास बंदी असतानाही रिक्षा व्यावसायिकांकडून या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. 

पिंपरी - मोरवाडीकडून इंदिरा गांधी पुलावर जाण्यास बंदी असतानाही रिक्षा व्यावसायिकांकडून या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. 

इंदिरा गांधी उड्डाण पुलावर विविध दिशांना जाणाऱ्या मार्गांवर एकूण पाच रिक्षाथांबे आहेत. त्यापैकी केवळ एकच म्हणजे भाटनगरकडून साई चौकाकडे जाणारा थांबा अधिकृत आहे; तर उर्वरित एकाही ठिकाणी रिक्षाथांब्याचा साधा फलकही नाही. या पुलावर काही रिक्षा व्यावसायिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांसमोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना अभय दिले जाते. त्याउलट नियम मोडणाऱ्या अन्य वाहनचालकांवर मात्र लगेचच कारवाईचा बडगा उगारला जातो. भाटनगरकडून प्रवाशांना घेऊन जाणारे काही रिक्षाचालक मोरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर वळणावर अचानक थांबतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडते. त्यातून अपघातही होतात. तेथून केवळ १५ ते २० फूट अंतरावर उभे असलेले वाहतूक पोलिसही अशा रिक्षा व्यावसायिकांना हटकतानाही दिसत नाहीत.

इंदिरा गांधी पुलावर दुपारी दोन ते चारदरम्यान पोलिस जेवणाच्या सुटीसाठी गेलेले असतात. त्या वेळी रिक्षाचालक विरुद्ध दिशेने पुलावर येतात. त्यांच्यावर तसेच रिक्षा उभ्या करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करू. 
- रवींद्र निंबाळकर, वाहतूक निरीक्षक, पिंपरी विभाग

Web Title: Rickshaw drivers breake the rule in pimpri