रिक्षाचालकांची मुजोरी कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत.

पुणे - कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यावर १७६ रिक्षाचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निलंबित केले आहेत. 

रिक्षाचालकांबाबत सहा महिन्यांत आरटीओकडे ६६१ तक्रारी आल्या आहेत. आरटीओकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने जादा भाडे आकारणे, जवळच्या अंतरावर प्रवासासाठी नकार देणे, जादा प्रवासी वाहतूक करणे, मीटर फास्ट करणे, उद्धट वर्तन आदींचा समावेश आहे. प्रवाशांनी लेखी किंवा हेल्पलाइनवर तक्रार केल्यावर संबंधित रिक्षाचालकाला आरटीओ कार्यालयात बोलविले जाते. त्याने गुन्हा ना कबूल केला, तर सहप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (एआरटीओ) त्याची सुनावणी होते. त्या वेळी प्रवाशालाही बोलविले जाते. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकल्यावर संबंधित अधिकारी पुढील कार्यवाही करतात. परवाना निलंबित झाला, तर तो किमान १० दिवसांसाठी केला जातो. तसेच दंडही सुमारे ५०० ते १००० रुपयांपर्यंत आकारला जातो. परवाना निलंबित करण्यात आलेल्या रिक्षाचालकांकडून सुमारे २५ लाख ९३ हजार रुपयांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वसूल केला आहे.  

कॅब कंपन्यांचे बेकायदा अतिक्रमण, सीएनजीचा अपुरा पुरवठा, थर्ड पार्टी विम्याचा प्रश्‍न आदी अनेक आव्हाने रिक्षाचालकांसमोर आहेत. व्यवसाय मंदावल्यामुळे दोन रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना व्यवसायाचीच भ्रांत असल्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे, हेही प्रवाशांनी समजून घ्यायला हवे. तरही रिक्षाचालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न संघटना करेल.
- नितीन पवार, रिक्षा पंचायत

...अशी करा तक्रार 
रिक्षाचालकाबद्दल तक्रार करायची असेल, तर प्रवाशांनी १८००२३३००१२ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवावी. तसेच पोस्ट कार्डवरही नाव-पत्त्यासह तक्रार पाठविली, तर त्याची दखल घेतली जाते, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. रिक्षाचालकाचा काय अनुभव आला, घटना कोठे आणि केव्हा घडली, रिक्षाचा क्रमांक आदींचा तपशील त्यात असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw drivers rude behavior to the passengers