esakal | Pune : रिक्षा भाड्यात सुमारे तीन रुपये वाढण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Auto Rikshaw

Pune : रिक्षा भाड्यात सुमारे तीन रुपये वाढण्याची शक्यता

sakal_logo
By
अक्षय साबळे

पुणे : शहर परिसरात रिक्षा भाड्यात साधारणपणे तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाढीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यात यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, येत्या दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी यांची मंगळवारी एकत्रित बैठक झाली. या बैठकीत रिक्षांच्या प्रवासी भाडेदराबाबत चर्चा झाली. शहरात २०१५ मध्ये शेवटची भाडेवाढ झाली होती. यानंतर भाडेदरात वाढ झालेली नाही. मध्यंतरी कोरोनाचे संकट आल्याने दरवाढीचा विषय लांबणीवर पडला होता. मात्र, कोरोना नियमांत शिथीलता दिल्यानंतर रिक्षा संघटनांनी भाडेदर वाढविण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी काही दिवसांपूर्वीच आरटीओ कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीला विविध १३ रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघटनांनी भाडेवाढ करण्याची मागणी लावून धरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत रिक्षाचालकांना भाडेवाढ देण्याबाबत एकमत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होणार असल्याचे ते म्हणाले.

अशी असणार भाडेवाढ?

शहरात सध्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी अठरा रुपये आणि त्यानंतर प्रतिकिलोमीटरला १२ रुपये ३१ पैसे दर आहे. यामध्ये तीन रुपयांनी वाढ करून पहिल्या टप्प्यासाठी २१, तर यानंतर प्रतिकिलोमीटरसाठी १४ रुपये ६० पैसे दरवाढ करावी, अशी रिक्षा संघटनांनी मागणी होती. ती आजच्या बैठकीत मान्य झाल्याचे समजते.

loading image
go to top