भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचे होणार प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

पुणे - स्पर्धेत टिकण्याबरोबरच प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्व रिक्षा संघटनांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

पुणे - स्पर्धेत टिकण्याबरोबरच प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्व रिक्षा संघटनांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

प्रवाशांशी उद्धट वर्तन, जादा पैसे घेणे, जवळचे भाडे नाकारणे अशा विविध कारणांमुळे नेहमीच प्रवासी रिक्षाचालकांविरोधत तक्रारी येतात. वाहतूक पोलिस आणि आरटीओकडे या विरोधात तक्रारी येऊनही रिक्षाचालकांच्या वागण्यात काही फरक पडत नाही, त्यामुळे पुणे नागरी प्रवासी संघाने रिक्षा पंचायतीचे डॉ. बाबा आढाव, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे बाबा शिंदे यांना पत्र पाठविले होते. रिक्षाचालकांच्या वागण्यात सुधारणा व्हावी, सर्व रिक्षाचालकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी आपणच प्रयत्न करा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली होती. सुकर, सुलभ, शासन निर्गमित प्रवासी दरानुसार प्रवाशांना प्रवास करता यावा, यासाठी आपण लक्ष घालावे, असेही पत्रात म्हटले होते.

या पत्राचा गांभीर्याने विचार करत डॉ. बाबा आढाव यांनी नुकतीच रिक्षाचालकांची बैठक घेतली. त्यामध्ये पत्रातील समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र वाहतूक संघाचे बाबा शिंदे यांनी दिली, तसेच दिवाळीनंतर शहरातीलच नाही तर राज्यभरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. भाडे नाकारणे, प्रवाशांशी वर्तणूक याबाबत रिक्षाचालकांचे प्रबोधन कसे करता येईल, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शहरातील महत्त्वाच्या प्रत्येक रिक्षा स्टॅंडवर रिक्षा संघटनांचा प्रतिनिधी थांबवून रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यासंदर्भातही या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

खासगी प्रवासी कंपन्यांशी स्पर्धा
ओला, उबेर यासारख्या खासगी प्रवासी कंपन्यांशी रिक्षाचालकांची स्पर्धा ही सर्वांत मोठी समस्या आहे. रिक्षाचालकांनी वेळीच प्रवाशांच्या दृष्टीने विचार केला नाही, तर रिक्षा प्रवासी खासगी कंपन्यांकडे वळू शकतो, त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे बाबा शिंदे यांनी सांगितले.

Web Title: rickshaw fares will be awakening