परमिट एक; रिक्षा मात्र अनेक

रवींद्र जगधने
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पिंपरी - कायद्यानुसार एका परमिटवर (परवाना) एकच रिक्षा नोंदणी केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी होत असल्याचा प्रकार माहिती कायद्यात समोर आला आहे. 

पिंपरी - कायद्यानुसार एका परमिटवर (परवाना) एकच रिक्षा नोंदणी केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी होत असल्याचा प्रकार माहिती कायद्यात समोर आला आहे. 

परिवहन कार्यालयात काही अधिकारी व दलाल यांच्यामार्फत हा प्रकार सर्रास सुरू असून, असे प्रकार कायमचे बंद करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे यांनी परिवहन आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे. काळे यांनी एका पतसंस्थेकडून रिक्षा खरेदीसाठी कर्ज घेतलेल्या एमएच १४ सीयू १४४०, एमएच १४ सीयू १५८८, एमएच सीयू २१७७, व एमएच १४ सीयू २१५६ या रिक्षांच्या परवाना क्रमांकासह संपूर्ण माहिती, तीन चाकी टेंपो एमएच १४ एझेड ०७६० आणि एमएच १४ डीएस १२७० या दुचाकींची माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. मात्र, त्यांना एकच परमिट दोन रिक्षा असल्याची माहिती वगळता बाकी सर्व माहिती दिली. त्यामुळे काळे अपिलात गेले असता, झालेल्या सुनावणीत अपील अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे आदेश दिले. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी त्यांना माहिती दिली नाही.

शहरात अशा बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात धावत असून, रिक्षांबाबत असलेल्या नियमावलीकडे वाहतूक पोलिस व परिवहन कार्यालयाच्या डोळेझाक करत आहेत.

या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले असून, एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे; तसेच रिक्षा विकणाऱ्या डीलरने डीलरशिप बंद केल्याने त्याचा शोध सुरू आहे. यातील दोशींवर कारवाई केली जाणार आहे. 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

आरटीओने अशा रिक्षा जप्त करण्यापूर्वी त्या रिक्षाला कर्ज देणाऱ्या बॅंक व वित्तीय संस्थेची ना हरकत घेणे गरजेचे आहे. शहरातील बेकायदा रिक्षांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवर अन्याय होत असून, प्रशासनाने बेकायदा रिक्षांना आळा घालावा. 
- श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा सेना

Web Title: Rickshaw Permit Registration