वारजे पुलाखाली रिक्षा धूळ खात

वारजे उड्डाण पूल - रस्त्यावर लावण्यात आलेल्या सहा आसनी रिक्षा धूळ खात पडल्या आहेत.
वारजे उड्डाण पूल - रस्त्यावर लावण्यात आलेल्या सहा आसनी रिक्षा धूळ खात पडल्या आहेत.

वारजे - वारजे येथील उड्डाण पुलाखाली परिवहन विभागाने कारवाई केलेल्या सहा आसनी रिक्षा गेल्या काही महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला आहे. तसेच या रिक्षांचा वापर बेकायदा धंद्यासाठी होत आहे. येथे नागरिक अस्वच्छता करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

परिवहन विभागाने या भागातील सहा आसनी रिक्षांवर कारवाई करून जवळपास पंधरा ते सोळा रिक्षा वारजे उड्डाण पुलाखाली लावल्या आहेत. त्यामुळे येथील एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला असून 
या रस्त्याचा वापर नागरिकांना करता येत नाही. 

तसेच रिक्षाच्या आडोशाला नागरिक घाण करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. दरम्यान, भिक्षेकरांनी या रिक्षांना आपले घर बनवले आहे. काही महिन्यांपूर्वी एका भिक्षेकरीचा येथे मृत्यू झाला होता. या रिक्षांमुळे भविष्यात येथे काहीही अनुचित प्रकार घडू शकतो .त्यामुळे येथील रिक्षा परिवहन विभागाने उचलाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या पुलाखाली परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाई केलेल्या रिक्षा उभ्या केलेल्या आहेत. आम्ही अनेक वेळा विभागाला त्या घेऊन जाव्यात यासाठी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, फोनवरूनही सांगितले आहे. मात्र, अद्यापही या रिक्षा उचलल्या नसल्याने त्या रस्त्यावरती पडून आहेत.
-  विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

कारवाई करण्यात आलेल्या या सहा आसनी रिक्षा येथून लवकरात लवकर उचलल्या जातील व त्यांचा थोड्याच दिवसांत लिलाव करणार आहे.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
    
रिक्षांच्या आडोशाला नागरिक लघुशंका करत असल्याने त्याचा दुर्गंध येथील गार्डनपर्यंत पसरलेला असतो. त्यामुळे आम्हाला गार्डनमध्ये  डबा खाणेही अवघड झाले आहे.        
- पुष्पा चोरघे, नागरिक, कर्वेनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com