गटशिक्षण अधिकाऱ्याकडून अधिकार कक्षेचे उल्लंघन : अॅड. संजय काळे

दत्ता म्हसकर
रविवार, 29 एप्रिल 2018

महाविद्यालयाची बदनामी करणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्याच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

जुन्नर - श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील अनुदानित तत्त्वावर काम करणारा कोणताही शिक्षक खासगी क्लास घेत नाही. याबाबतीत गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी अधिकार कक्षेचे उल्लंघन करून चौकशीचा फार्स केला आहे, असे अध्यक्ष अॅड. संजय काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. 

महाविद्यालयात IIT/JEE, व NEET या सारख्या पात्रता प्रवेश परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्गातील प्रवेश पूर्णपणे ऐच्छिक आहे. महाविद्यालयाच्या 842 विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत, यामध्ये 122 विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. फीच्या रूपाने त्यांच्याकडून एक नवा पैसा न घेता पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा लाखो रुपयांचा खर्च या संस्थेने केला आहे, अशी वस्तुस्थिती असताना भुजबळ यांनी चुकीची माहिती असणाऱ्या बातम्या देऊन संस्थेची जाणीवपूर्वक बदनामी केली आहे, अॅड. काळे यांनी संस्थेची बाजू मांडण्यासाठी महाविद्यालयात शनिवारी ता. 28 ला सांयकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. 

प्रशिक्षण वर्गासाठी दहावीची परीक्षा दिलेले तीन विदयार्थी उपस्थित असून त्यांचेकडून कोणतेही शुल्क आकारले नाही. त्यांना केवळ महाविद्यालयाचा परिचय होऊन शास्त्र विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने बोलविण्यात आले आहे. तसेच पालकांच्या मागणीनुसार अकरावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी सुट्टीतील जादा तास सुरु आहेत त्यांच्याकडून देखील कोणतेही शुल्क घेतले नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अद्याप फी घेतली नाही असे असताना शुल्क घेतले असल्याचे भुजबळ यांचे म्हणणे चुकीचे आहे.

या भेटी दरम्यान त्यांनी आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन, अनाधिकाराने महाविद्यालयात प्रवेश करून महिला व अन्य प्राध्यापकांशी उर्मट वर्तन केले, अशा तक्रारी प्राध्यापकांनी केल्या आहेत. उपाध्यक्ष निवृत्ती काळे, पालक प्रतिनिधी अशोक काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य एस.डी.सूर्यवंशी व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाची बदनामी करणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्याच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे तसेच याबाबतीत पंचायत समितीच्या मासिक सभेत झालेली चर्चा व ठराव देखील हास्यास्पद आहे, असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: right violation from education officer says sanjay kale